सोशल मिडीयाची करामत, वाट चुकलेल्या गुरांना मिळाले मालक!   

 

*मसुरे | झुंजार पेडणेकर* माणसाच्या हातात स्मार्ट फोन आहे. तो रस्ता चुकला तर कुणाला तरी पत्ता विचारू शकतो किंवा इच्छित स्थळ गाठण्यासाठी मोबाइल मधील ‘जिपीएस नेव्हीगेशन सिस्टीम ‘ वापरू शकतो . परंतु त्या मुक्या जीवांजवळ कुठून असणार जिपीएस? घरची वाट चूकल्याने तब्बल चार दिवस सुमारे 20 किमीचा प्रवास करत दोन बैल आणि एक पाडी शिरवंडे येथून मसुरे येथे फिरत फिरत पोहोचली. परंतु सोशल मीडियावरील पोस्ट मुळे नाट्यमयरीत्या गुरुवारी दुपार नंतर पुन्हा मूळ मालकाच्या गोठ्यात विसावली ! खरं तर मुक्या प्राण्यांना कसल्या आल्या भावना असं आपण बोलू शकतो. परंतु चार दिवसांनी दिसलेला आपला मालक पाहून लांब बसलेली ही गुरे त्यांच्या जवळ आली. जणू काही सुटकेचा निश्वास सोडण्यासाठी. आणि हे दृश्य पाहताना मनात अलगद उमटून गेल्या आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेल्या धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना या गाण्यातील ‘शब्द रूप आले मुक्या भावनाना’ या ओळी!

▪️3 नोव्हेंबर पासून गुरे बेपत्ता मालवण तालुक्यातील शिरवंडे पिंपळवाडी येथील सखाराम शांताराम गावकर यांनी 3 नोव्हेंबर रोजी आपली गुरे नेहमी प्रमाणे सड्यावर चरण्यासाठी सोडली. सकाळी सोडलेली गुरे संध्याकाळी घरी न आल्याने गावकर यांनी सड्यावर शोधाशोध केली. परंतु त्यांना आपल्या गुरांबाबत काहीच माहिती मिळाली नाही. लगतच्या वाडीतील शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी गुरे हरवल्या बाबत सांगितले. परंतु कोणाकडूनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. या भागामध्ये बिबट्या वाघ तसेच गवेरेडे यांचा वावर सर्रास असल्याने कदाचित ही गुरे शिकार तर झाली नसतील ना? अशी शंका सुद्धा त्यांच्या मनात आली. परंतु शोध घेण्या पलीकडे त्याच्या हातात दुसरी कोणतीच गोष्ट नव्हती.

▪️गुरांचे फोटो व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल

दरम्यानच्या कालावधीत सदर दोन बैल आणि एक छोटी पाडी 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी मसुरे येथे तेथील ग्रामस्थांना दृष्टीस पडली. हे तीन जीव नक्कीच वाट चुकलेले आहेत याची खात्री झाल्याने काही ग्रामस्थांनी या गुरांचे एकत्रित फोटो काढत व्हाट्सअप ग्रुप वर पाठवले. सोशल मीडियाच्या माध्यमातून मसुरे मागवणे येथील गावकर यांच्या नातेवाईकांना ही पोस्ट व्हाट्सअप वर दिसताच त्यांनी ही गुरे आपल्याच नातेवाईकांची असल्याची खात्री झाली. 5 नोव्हेंबरला ही तिन्ही गुरे सायंकाळी मसुरे बाजारपेठेतून पुन्हा परतीचा मार्ग पकडून रात्री मसुरे येथील बागवे हायस्कुलच्या मैदानावर विसावली. गुरुवारी सकाळी सदर गुरे मैदानावर दिसताच जागृत ग्रामस्थांनी मैदानाचे मुख्य गेट बंद केल्याने ही गुरे मैदानातच राहिली. दरम्याच्या कालावधीत शिरवंडे येथील गावकर यांना आपली गुरे मसूरे येथे असल्याबाबत माहिती कळविण्यात आली होती.

▪️मालकांना पाहून गुरे आनंदली

गावकर हे मसूरे येथे गुरांना नेण्यासाठी आल्यावर आपल्या मालकांना पाहून दूर मैदानाच्या कोपऱ्यात बसलेली ही गुरे मालकाच्या जवळ गेट नजिक आली. आता आपण आपल्या मालकाच्या घरी जाणार या विचाराने बहुदा ही गुरे आनंदून गेली असावी. आपला मालक न्यायला आल्याबद्दल आभार मानणारी त्यांची भावमुद्रा या गुरांना न्ह्याहाळताना दिसून येत होती. अखेर मसूरे येथे टेम्पो मध्ये बसून सदर गुरे चार दिवसांनी आपल्या मालकाच्या घरी मार्गस्थ झाली. गुरांना आपल्या घरी नेताना गावकर यांनी ग्रामस्थांचे आभार मानत घरची वाट धरली.

सोशल मिडीयाची ताकद झाली अधोरेखित

घराची वाट चुकलेल्या या गुरांना त्यांच्या मालकाकडे परतण्याचा मार्ग सोशल मीडियामुळे सापडला हे खरोखरच एक सकारात्मक पाऊल आहे. समाजातील एकता आणि सहकार्याची भावना अधोरेखित करणारी ही घटना आहे. सोशल मीडिया किती ताकदवान आहे याचा प्रत्यय आपण वेळोवेळी घेत असतो. परंतु या मुक्या जीवांना सुधीर पुन्हा आपला मालक याच सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाल्यामुळे हे माध्यम किती मजबूत आहे हे आणखी एकदा अधोरेखित झाले.