आता राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
सावंतवाडी । प्रतिनिधी : श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. आयुष दत्तप्रसाद पाटणकर याने राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक संचालनालय यांच्या वतीने दिनांक २७ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे आयोजित केलेल्या १९ वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धेत आयुषने सहभाग घेतला होता.
या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत त्याने ४०० पैकी ३७९ गुणांची नोंद करत प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
या दिमाखदार विजयामुळे आयुष पाटणकर आता राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे अधिकृत प्रतिनिधित्व करणार आहे.
*सातत्यपूर्ण कामगिरी आणि ऑलिम्पिकवारी:*
आयुषची ही कामगिरी योगायोगाने मिळालेली नसून, तो सातत्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आला आहे. यापूर्वी गतवर्षी कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने ४०० पैकी ३७८ गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले होते आणि त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ‘गुणवंत खेळाडू’ हा सन्मानही प्राप्त झाला आहे.
त्याने घेतलेली मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि त्याला वडील दत्तप्रसाद पाटणकर यांचे मिळालेले अथक मार्गदर्शन व प्रोत्साहन यांमुळे आयुषची ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सिंधुदुर्गकरांसाठी हा अत्यंत गौरवास्पद आणि अभिमानाचा क्षण आहे.
या तेजस्वी यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोसले (राजेसाहेब), चेअरमन सौ. शुभदादेवी भोसले (राणीसाहेब), विश्वस्त युवराज लखमसावंत भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, संस्थेचे संचालक प्रा. डी. टी. देसाई, सहसंचालक डॉ. शामराव सावंत, संस्थेचे सदस्य सतीश सावंत, जयप्रकाश सावंत, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. व्ही. पी. राठोड, मदर क्वीन्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगावकर, तसेच प्रा. एम. ए. ठाकुर आणि पालक दत्तप्रसाद पाटणकर यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रीडाप्रेमींना आता राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत आयुषकडून पदकाची अपेक्षा आहे.












