सावंतवाडीला राज्यातील ‘मॉडेल शहर’ बनवणार : नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांचा विकाससंकल्प

एका वर्षात पाणीप्रश्न सोडविणार : स्वच्छता, आरोग्य आणि पर्यटनावर भर देणार

सावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी नगरपालिकेच्या कारभाराला एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा ‘रोडमॅप’ सादर केला. “सावंतवाडी हे माझे कुटुंब असून, शहराला राज्यातील एक ‘मॉडेल शहर’ बनवण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगर परिषद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर व भाजपचे अन्य नगरसेवक उपस्थित होते.

*स्वच्छतेतून समृद्धी: वॉर्डनिहाय अभियान*

निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना ‘स्वच्छता’ हे पहिले पाऊल असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ ही संकल्पना राबवताना वेंगुर्ले शहराच्या धर्तीवर नवनवीन उपक्रम राबवले जातील. बस स्थानक, नरेंद्र उद्यान आणि शहरातील सर्व लहान-मोठ्या उद्यानांची स्वच्छता करण्यासाठी वॉर्डनिहाय विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.

पाणीप्रश्न आणि गॅस पाईपलाईन

शहरातील पाणीपुरवठ्याबाबत मुख्याधिकारी व ठेकेदारांशी चर्चा करून एक ठोस आराखडा तयार करण्यात आला आहे. येत्या एका वर्षात सावंतवाडीकरांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे ध्येय त्यांनी जाहीर केले. तसेच, शहरात गॅस पाईपलाईनचे काम पूर्णत्वास नेणार असून, या कामामुळे होणारा तात्पुरता त्रास सहन करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

*कचरा व्यवस्थापन व आरोग्य सुविधा*

कचरा डेपोची समस्या सोडवण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण (Segregation) आणि रिसायकलिंगवर भर दिला जाईल. शहराच्या सीमेवर टाकला जाणारा कचरा ही मोठी समस्या असून त्यावर कडक उपाययोजना केल्या जातील. आरोग्य विभागाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी आणि महिला रुग्णांच्या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे. सावंतवाडीत लवकरच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल.”

*भटके कुत्रे आणि वाहतूक कोंडीवर उपाय*

शहरातील सुमारे १२०० भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ‘मिशन रेबिज’च्या माध्यमातून दीड वर्षात निकाली काढला जाईल. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘पे अँड पार्क’ आणि ‘नो पार्किंग झोन’ निश्चित करून कडक कारवाई केली जाणार आहे.

*पर्यटन आणि बंद प्रकल्प होणार सुरू*

सावंतवाडीच्या वैभवात भर टाकणारे मँगो टू हॉटेल (पर्यटन सुविधा केंद्र), रघुनाथ मार्केट आणि हेल्थ पार्क यांसारखे बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले जातील. तसेच शहरात नवीन ‘फूड पार्क’ उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. विकासाच्या कामात कोणतेही राजकारण आणणार नसून, सर्व नगरसेवक आणि नागरिकांना विश्वासात घेऊनच शहराचा कायापालट करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 

 

*रजेवर जाणार पण विकास थांबणार नाही : श्रद्धाराजे भोसले*

 

“काही वैयक्तिक कारणास्तव मी काही दिवस रजेवर जाणार असले, तरी ऑनलाईन यंत्रणेद्वारे मी सहकाऱ्यांच्या सतत संपर्कात असेन. सावंतवाडी हे माझे कुटुंब आहे आणि शहराच्या समस्या सोडवणे हीच माझी प्राथमिकता आहे. या काळात सावंतवाडीकर आपल्या मुलीला नक्कीच साथ देतील,” असे भावनिक आवाहन श्रद्धाराजे भोंसले यांनी केले.