सोमवारी १० नोव्हेंबर पासुन अर्ज स्विकारणार
राजापूर प्रतिनिधी : राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रशासकिय यंत्रणा सज्ज असून सोमवार १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज स्विकारण्यास प्रारंभ होणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सुचनांप्रमाणे प्रशासनाकडून या निवडणूकीची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती राजापूर तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
राजापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहिता व कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी राजापूर तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
या पत्रकार परिषदेत गंबरे यांनी राजापूर नगर परिषदेच्या एकूणच निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. या निवडणूकीसाठी प्रशासकिय यंत्रणा सज्ज असल्याचे नमुद करत निवडणूक कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर परिषद निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्यास 10 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार असून 17 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. असून अर्जांची छाननी 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर पर्यंत असून, निवडणूक चिन्हांचे वाटप 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतदान 2 डिसेंबर रोजी तर निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे.
सोमवारी १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार असून उमेदवार व जनतेला या निवडणूकीबाबत माहिती देण्यासाठी नगर परिषद कार्यालयात विशेष कक्ष सुरू केली जाणार आहेत.
राजापूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह दहा प्रभागांतील २० नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होणार आहे. यासाठी दहा मतदान केंद्र असणार आहेत. या निवडणूकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाली असून एकूण ८ हजार १४३ इतके मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ४ हजार २१९ महिला मतदार तर ३ हजार ९२४ इतके पुरूष मतदार यांचा समावेश आहे.
या निवडणूकीत नगराध्यक्षपदासाठी साडेसात लाख तर नगरसेवक पदासाटी दोन लाख पन्नास हजार इतक्या खर्चाची मर्यादा असून उमेदवाराला यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत स्वतंत्र खाते उघडावे लागणार आहे. ऑनलाईन पध्दतीन उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे असून नंतर तो अर्ज कागदपत्रांसह सादर करावयाचा आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत मालमत्ता, अपत्यांबाबत व गुन्हयांची माहीती अशी तीन प्रतिज्ञापत्रे पुर्ण भरून सादर करावयाची आहेत. सर्वसाधारणसाठी एक हजार रूपये अनामत कर नागरिकांचा मागस प्रवर्ग व महिलांसाठी ५०० रूपये अनामत रक्कम असणार आहे. आरक्षित प्रभागातुन निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जातप्रमाणपत्र जोडावे लागणार असून जातपडताळणीसाठी प्रस्ताव सादर केल्याची पावती द्यावी लागणार आहे. राजकिय पक्षांच्या उमेदवारांना एक सुचक तर अन्य उमेदवारांना पाच सुचक आवश्यक असणार आहेत. उमेदवार जरी त्या प्रभागातील नसला तरी सुचक मात्र त्याच प्रभागातील असणे आवश्यक आहे.
राजकिय सभा, रॅली यासाठी आवश्यक त्या परवानग्या त्या त्या विभागाकडून घेणे बंधनकारक असून खासगी भिंती व जागेवर प्रचार साहित्य लावण्यासाठी मालकांची परवानगरी बंधनकारक असणार आहे. या एकूणच नियमांबाबत सर्व राजकिय पक्षांना माहिती देण्यात आली असून यासाठीही एक कक्ष सुरू करून माहिती दिली जाईल. एकूणच कशा प्रकारे शहरात निवडणूक ही निवडणूक प्रक्रीया राबविली जाणार आहे याबाबत गंबरे यांनी पत्रकारांना माहिती दिली.
निवडणूकीबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचना व नियमांचे काटेकोर पालन हे राजकिय पक्ष व उमेदवारांनी केले पाहिजे असे आवाहनही गंबरे यांनी केले आहे.










