सावंतवाडी कारागृहाच्या नवीन संरक्षक भिंत बांधकामाला प्रशासकीय मंजुरी

​सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जिल्हा कारागृहाच्या जीर्ण झालेल्या संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी राज्य शासनाच्या गृह विभागाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. सुमारे ४ कोटी ४ लाख ८० हजार २१६ रुपये एवढ्या रकमेच्या कामास ही मंजुरी प्राप्त झाली असून, त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

​ ​ जुलै २०२५ मध्ये, मुसळधार पावसामुळे सावंतवाडी येथील संस्थानकालीन जिल्हा कारागृहाची ऐतिहासिक संरक्षक भिंत कोसळली. दगडी भिंतीवर सिमेंटचे बांधकाम केल्याने ती कमकुवत झाली आणि भिंतीचे वजन पेलता न आल्याने कोसळल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे ऐतिहासिक वास्तू धोक्यात आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु कैद्यांना ओरोस कारागृहात हलवण्यात आले होते.

या ​कोसळलेल्या भिंतीची पाहणी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केली होती. त्यांच्या निर्देशानुसार विशेष समितीद्वारे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यानंतर कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांनी तांत्रिक मान्यतेसह सविस्तर प्रस्ताव मा. अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे सादर केला होता.

ही भिंत सुमारे १४३ वर्षे जुनी असल्याने तिचे झालेले स्ट्रक्चरल ऑडिट व अहवाल यानुसार, भिंतीला अनेक ठिकाणी भेगा पडल्या होत्या. ती जीर्ण आणि असुरक्षित झाल्याने कारागृहाच्या सुरक्षिततेसाठी अस्तित्वातील भिंत पाडून त्याऐवजी नव्याने आर.सी.सी. प्रकारची संरक्षक भिंत बांधण्याची आवश्यकता निर्माण झाली होती.

​ ​ गृह विभागाची प्रशासकीय मंजुरी
​सादर झालेल्या या प्रस्तावानुसार, राज्याच्या गृह विभागाने अखेरीस दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी शासन निर्णय क्र. जेएलएस-११२५/ प्र.कृ-२२९/ तुरुंग-२ अन्वये ४ कोटी ४ लाख ८० हजार २१६ रुपयांच्या कामास प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यामुळे सावंतवाडी कारागृहाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले हे काम आता लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.