व्यसनमुक्तीसाठी ‘नशा मुक्त दोडामार्ग’ जनजागृती पदयात्रा: डॉ. प्रसाद देवधर यांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन

​दोडामार्ग –प्रतिनिधी
​माणूस गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य फार सुंदर आहे. आयुष्याचे खरे रंग अनुभवण्यासाठी आपले डोके शाबूत ठेवणे आवश्यक आहे. यासाठी आपण कोणत्याही प्रकारची नशा करू नये, तरच जीवनातील खरे सौंदर्य कळू शकते, असे स्पष्ट मत भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी व्यक्त केले.

​पंचायत समिती दोडामार्ग यांच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ‘नशा मुक्त दोडामार्ग’ जनजागृती पदयात्रा नुकतीच संपन्न झाली. यावेळी बोलताना डॉ. देवधर यांनी व्यसनमुक्तीबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
जनजागृती पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

​सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास जि. प. शाळा क्रमांक १ च्या मैदानावरून पदयात्रेला सुरुवात झाली. जवळपास ६ किलोमीटर पायी चालत ही पदयात्रा शरदक्षेत्र सभागृह झरेबाबर येथे समाप्त झाली. त्यानंतर सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्यात डॉ. देवधर बोलत होते.

ते पुढे म्हणाले की,
​आपली मुले कोणी श्रावणबाळ नाहीत, तसेच पालकही श्री रामांचे अवतार असू शकत नाहीत. त्यामुळे सर्वांनी आपली जबाबदारी ओळखावी.
​सरकार दारू बंदी, सिगारेट बंदी करू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीने स्वतःची जबाबदारी आहे असे समजून व्यसन करूच नये.

​ व्यसनापासून दूर राहणेच श्रेयस्कर
​आपल्या भाषणात डॉ. देवधर यांनी व्यसनाचे दुष्परिणाम आणि त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व पटवून दिले:
​काही लोक फक्त रविवारी दारू पितात, पण कालांतराने त्या व्यक्तीला रोजच रविवार वाटायला लागतो. यामुळे तो दररोज पितो आणि व्यसनाधीन होऊन मृत्युमुखी पडतो. यापेक्षा त्या व्यसनापासून दूर राहणेच सर्वस्वी सोयीस्कर ठरते.
​मुलगा दारू पीत असेल तर त्याचे लग्न करून दिल्यास तो दारू सोडेल, ही कल्पना चुकीची आहे. दारू पिणाऱ्याचे आयुष्य तर धोक्यात असतेच, शिवाय त्याच्यामुळे दुसऱ्याच्या मुलीचेही आयुष्य धोक्यात येते. त्यामुळे लग्न करून देणे हा उपाय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

​यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, झरेबांबर सरपंच तथा सरपंच सेवासंघाचे तालुकाध्यक्ष अनिल शेटकर, नशाबंदी मंडळ सिंधुदुर्गच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर, आयनोडे सरगवे पुनर्वसनच्या सरपंचा श्रुती देसाई, हेवाळे सरपंच साक्षी देसाई आदी उपस्थित होते.

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त कनिष्ठ प्रशासन अधिकारी जगदीश सावंत यांनी केले.
​सूत्रसंचालन सुमित दळवी यांनी केले.

​दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाल्यानंतर विद्यार्थिनी स्पृहा सुमित दळवी आणि दक्षता बाबुराव घोगळे यांनी व्यसनमुक्ती संदर्भात भाषण केले.

​करण शेटकर यांची ‘सेवन’ नावाची व्यसनमुक्तीपर मार्गदर्शनासाठी चित्रफितही यावेळी दाखविण्यात आली.