वेंगुर्ले : दाजी नाईक
‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून वेंगुर्ले येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पुढाकाराने आयोजित “वंदे मातरम् सार्धशताब्दी महोत्सव” कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भारत मातेच्या या स्तुतीचा गौरव दिन कार्यक्रमाला मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुकास्तरीय समितीतर्फे आयोजित केलेल्या ‘वंदे मातरम्’ सार्धशताब्दी महोत्सव सामूहिक गायन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन केले. यावेळी वेंगुर्ले नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेमंत किरूळकर, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, प्रमुख वक्ते निवृत्त शिक्षक विनायक खवणेकर, निवृत्त बँक अधिकारी सुधीर ठाकुर, जिल्हा शिक्षण व औद्योगिक प – शिक्षण अधिकारी आनंद देसाई, सिंधुदुर्ग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य भूषण सोनावणे, वेंगुर्ल्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य जगदीश गवस, हेमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. पूजा कर्पे, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, कौशल्य विकास संस्था प्रतिनिधी राजेश शिरगावकर, मयुरी परब, पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, उपअभियंता प्रफुल्लकुमार शिंदे, तालुका कृषी अधिकारी प्रकाश मोहिते, सहाय्यक कृषी अधिकारी राजू गव्हाणे, बचत गट प्रमुख आकांक्षा परब, संगीत शिक्षिका अनघा गोगटे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संगीत विशारद अनघा गोगटे व मधुरा आठलेकर यांच्या वंदे मातरम् सोबतीने समूह गायनाने झाली. त्यानंतर वंदे मातरम् या गीताबद्दल विस्तृत असे मार्गदर्शन निवृत्त शिक्षक विनायक खवणेकर यांनी केले. ते म्हणाले, ब्रिटीश राजवटीचा तो काळ होता. भारत गुलामगीरीत खपत होता. बाह्य आव मनांनी देशातील संस्थानिके खालसा होत होती. अशावेळी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय या लेखकाने आनंदमठ ही कादंबरी लिहिली होती. या कांदबरीत वंदे मातरम् है गीत त्यांनी लिहिले होते. भारतमातेप्रती आदर, प्रेम आणि भारतमातेच्या महानतेची गरिमा सांगणारे हे गीत अनेकांना प्रेरणा देत राहिले. ते भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं घोषवाक्य बनलं. त्याच्या घोषणांनी ब्रिटिश साम्राज्याच्या मुळापर्यंत हादरे दिले. क्रांतीवीर, आंदोलनकर्ते, सत्याग्रही सगळ्यांच्या ओठांवर एकच घोषणा होती ती म्हणजे ‘वंदे मातरम् !’












