राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ६३ उमेदवार इच्छुक

 उमेदवारी जाहीर करण्याचे पक्षासमोर आव्हान

चिपळूण (प्रतिनिधी) : येथील पालिकेच्या निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छिकांमध्ये स्पर्धा पहायला मिळत आहे. २८ जागांसाठी ६३ इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्लमेंटरी बोर्ड प्रभागात जाऊन ऑन द स्पॉट उमेदवारांची निवड करणार आहे. अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी यांनी दिली.
चिपळूण पालिकेत १४ प्रभागातून २८ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. महायुतीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अंतिम झालेला नाही. तो वरिष्ठ पातळीवर ठरेल असे सांगितले जात आहे मात्र तयारी तिन्ही घटक पक्षांची सुरू आहे. भाजपकडे नगराध्यक्षपदासाठी सात जण इच्छुक आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे एक तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे दोघेजण इच्छुक आहेत. नगरसेवक पदासाठी भाजपकडे ६५ इच्छुकांनी अर्ज केले आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्येही अनेकांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शहरातील राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयात इच्छुकांसाठी अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. १० नोव्हेंबर पर्यंत ६३ जणांनी अर्ज घेतले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. पक्षाकडून ताकद मिळेल या आशेने अनेकांनी तयारी सुरू केली आहे त्यामुळे अर्ज विक्रीची मुदत वाढवण्यात आली आहे. इच्छुकांची नावे समोर आल्यानंतर त्यातून अंतिम उमेदवार निवडला जाणार आहे. उमेदवार निवडताना यावेळी पक्षाने वेगळी शक्कल लढवल्या आहेत. वशिलेबाजी, घराणेशाही तसेच पक्षाच्या रसदीवर अवलंबून न राहता मतदार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मत त्या उमेदवाराबद्दल काय आहे याची पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे विशिष्ट मंडळ प्रत्येक प्रभागात जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांची मतं समजून घेणार आहे. तो उमेदवार निवडून येऊ शकतो का, प्रभागात त्याच्याबद्दल जनमत काय आहे. याची चौकशी होईल, त्यानंतर ऑन द स्पॉट उमेदवार जाहीर केला जाईल. चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत प्रथमच उमेदवार निवडण्यासाठी अशी पद्धत राबवली जात आहे.
चौकट-
पक्षाकडे अनेकांनी उमेदवारी मागितली आहे. दहा तारखेपर्यंत इच्छुकांचे अर्ज घेतले जातील. अकरा तारखेला मुलाखती होतील त्यानंतर प्रभागात जाऊन उमेदवारांच्या बद्दलचे जनमत आजमावले जाईल. त्यानंतर उमेदवार ठरेल. महायुती झाली तर ज्या जागा वाट्यात तेथील उमेदवारांना संधी दिली जाईल.
-मिलिंद कापडी, शहर प्रमुख-
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

चौकट-
शिवसेनेकडे ७० अर्ज
माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. नगरसेवक पदासाठी ७० जणांनी अर्ज केल्याचे माजी आमदार आणि उपनेते सदानंद चव्हाण यांनी सांगितले. महायुती झाल्यानंतर अंतिम उमेदवार निवडले जातील असे त्यांनी सांगितले.