सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेची शासनाकडे मागणी
वेंगुर्ले : प्रतिनिधी
चालू वर्षी सतत पडलेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील अनेक शेतकऱ्यांचे चारापिक तसेच गवताचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या अत्याधिक प्रमाणामुळे पाण्याखाली गेलेल्या गवताचे कुजून नासधूस झाली असून त्यामुळे जनावरांसाठी चारा आणि गवत मिळवणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. परिणामी दूध उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मका बियाण्यांची तातडीने उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे.
या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर राय यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “सततच्या पावसामुळे भात (धान) पासून गवतापर्यंत मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत पर्यायी चारापिक म्हणून मका महत्त्वाचा आहे. त्यामुळे शासनाने तातडीने मका बियाण्यांचा पुरवठा करावा,” अशी विनंती करण्यात आली आहे. शेतकरी अडचणीत असून पशुपालन व दूध व्यवसाय टिकवण्यासाठी शासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत. या बाबत शासनाला द्यायचे निवेदन संघटने तर्फे जिल्हाध्यक्ष राय यांनी वेंगुर्ले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि पसुसर्धन विभाग यांच्या कडे सादर केले आहे.













