कणकवली : सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी खवळे महागणपतीचे दर्शन घेऊन ट्रस्टतर्फे होणाऱ्या विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचा शुभारंभ केला.

या वेळी त्यांनी सांगितले की, “खवळे महागणपती ट्रस्ट विविध सामाजिक तसेच धार्मिक उपक्रम राबवते. हे उपक्रम आदर्शवत आहेत. ट्रस्टतर्फे यंदा राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा शुभारंभ आज मी केला आहे. गेली अकरा वर्ष मी न चुकता खवळे महागणपतीच्या दर्शनाला येतो आहे. खवळे कुटुंबीय व आमचे संबंध हे राजकारणाच्या पलिकडचे आहेत. ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवगडला येतील, त्यावेळी ते नक्की येथे भेट देतील,” असे त्यांनी नमूद केले.
शुभारंभ प्रसंगी नामदार नितेश राणे यांनी पंचजोती प्रज्वलित केली. ट्रस्टचे पदाधिकारी सूर्यकांत खवळे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, दयानंद पाटील, सिद्धेश माणगावकर सर्व नगरसेवक आदी उपस्थित होते.
सूर्यकांत खवळे यांनी ट्रस्टतर्फे यंदाच्या विविध स्पर्धांचा शुभारंभ नामदार नितेश राणे यांनी केल्याचे जाहीर केले.
दरम्यान, देवगड भेटीदरम्यान नामदार नितेश राणे यांनी जामसंडे येथील ग्रामदैवत दिर्बादेवी रामेश्वराचे तसेच देवगडमधील विविध घरगुती गणेशांचे दर्शन घेतले. शिरगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सवाला देखील त्यांनी भेट दिली.













