कोकणातील साकवांचे पुलांमध्ये रूपांतर; कळंबणी बुद्रुक येथे साकवाच्या कामाचे भूमिपूजन

राज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची साथ; विकासासाठी मिळणार भरघोस निधी

खेड (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुक गावडेवाडी येथे अंदाजे ४० लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या साकवाचे भूमिपूजन ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते पार पडले. या साकवामुळे गावातील नागरिकांना पावसाळ्यात ये-जा सुलभ होण्यासोबतच शेती, शिक्षण आणि दैनंदिन व्यवहारातील अडचणी दूर होणार आहेत.
कोकण विभागाचा सर्वांगीण विकास ही आपली बांधिलकी असून, कोकणातील साकवांचे पुलांमध्ये रूपांतर करण्याची मागणी शासन पातळीवर सातत्याने पुढे रेटल्याचे राज्यमंत्री कदम यांनी सांगितले. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली. “या निर्णयामुळे कोकणातील अनेक गावांकरिता प्रवास आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे,” असे कदम यांनी स्पष्ट केले.
ग्रामविकास विभागामार्फत कळंबणी परिसरातील रस्ते, संपर्कमार्ग आणि प्राथमिक सुविधा यांची कामे नियोजितपणे पूर्ण करण्याची हमीही त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिली. कामाच्या गुणवत्तेवर कोणतीही तडजोड न करता प्रकल्प जलद गतीने पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमास शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अण्णा कदम, कळंबणी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.