मुंबई-गोवा महामार्गावर खवटी रेल्वे पुलाजवळ टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात

दहिसरमधील एकाच कुटुंबातील चौघे जखमी

खेड । प्रतिनिधी : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, आज शुक्रवारी (८ मे २०२६) सकाळी ११:५० च्या सुमारास खवटी रेल्वे पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झाला. या अपघातात मुंबईतील दहिसर येथील एकाच कुटुंबातील चार प्रवासी जखमी झाले आहेत. हे सर्वजण मुंबईहून गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी जात असताना हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो ट्रॅव्हलर (क्रमांक अप्राप्त) खवटी रेल्वे पुलावरून जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि वाहन महामार्गावरच उलटले. या अपघाताची माहिती मिळताच ‘जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्य जी महाराज संस्थान, नाणिज धाम’ ची विनामूल्य रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सूरज हंबीर यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने बाहेर काढून उपचारांसाठी हलवले.

 
या अपघातात खालील प्रवासी जखमी झाले आहेत:
• अनु विनायक कोलमकर (३८ वर्ष, रा. दहिसर)
• त्रिशा अनिल सिंग (८ वर्ष, रा. दहिसर)
• गुंजन अनिल सिंग (११ वर्ष, रा. दहिसर)
• अनिल श्रीशंकर सिंग (३८ वर्ष, रा. दहिसर)
सुदैवाने या अपघातात सर्व प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. महामार्गावरील धोकादायक वळणे आणि चालकाचा ताबा सुटणे यामुळे हे अपघात वाढत असल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.