दापोलीत ‘फ्रेंडशीप दापोली’तर्फे पहिल्या रांगोळी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत सृजनतेचा अनोखा रंगोत्सव

दापोली (विशेष प्रतिनिधी) – कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या “फ्रेंडशीप दापोली” या संस्थेमार्फत नगरपंचायत दापोलीच्या प्रांगणात प्रथमच रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. दापोलीतील विविध कलाकारांनी कल्पकतेने साकारलेल्या रांगोळ्यांतून कलेचा सृजनशील आविष्कार आणि समाजाशी संवाद साधण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला.
या प्रदर्शनास राज्याचे युवा नेते तथा आमदार श्री. योगेश कदम यांनी भेट देऊन कलाकृतींचे अवलोकन केले. यावेळी दापोलीतील कलाकारांनी साकारलेल्या रांगोळ्या केवळ सौंदर्याचा आविष्कार नसून सामाजिक संदेश, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, स्थानिक सांस्कृतिक परंपरा आणि आधुनिक दृष्टीकोन या विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या होत्या. त्यामुळे हे प्रदर्शन केवळ कलात्मक नव्हे तर विचारप्रवर्तक ठरले.
याप्रसंगी प्रसिद्ध चित्रकार श्री. शकुनदेवजी महाकाळ यांनी रेखाटलेले आमदार श्री. योगेश कदम यांचे तैलचित्र फ्रेंडशीप दापोलीच्या वतीने त्यांना भेट देण्यात आले. या भेटीद्वारे दापोलीवासीयांनी आमदार कदम यांच्यावरील आपुलकी अधोरेखित केली. “दापोलीतील प्रत्येक कलाकारात दडलेली क्षमता, आत्मविश्वास आणि सृजनशीलता पाहून आनंद झाला. कलेच्या माध्यमातून समाजाशी संवाद साधणारे असे उपक्रम अधिकाधिक व्हावेत,” असे आमदार कदम यांनी यावेळी सांगितले.
प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमास नगराध्यक्षा श्रीमती कृपाताई घाग, शिवसेना शहर प्रमुख श्री. पप्पूजी रेळेकर, माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती श्री. भगवानजी घाडगे, फ्रेंडशीप दापोलीचे पदाधिकारी, विविध कलाकार तसेच दापोलीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदर्शनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने दापोलीतील कला संस्कृतीला नवे चालना मिळाल्याचे मत स्थानिक कलाकारांनी व्यक्त केले. फ्रेंडशीप दापोलीतर्फे असे उपक्रम पुढेही सातत्याने राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.