रायगड :
सालाबाद प्रमाणे १४ व्या वर्षी जिजाऊ प्रतिष्ठान आणि नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड (NAB) यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग /दृष्टबाधित विद्यार्थ्यांसाठी यापूर्वी १३ गिरीदुर्गावर दुर्ग दर्शन मोहिमा झाल्या आहेत. यावर्षी जलदुर्ग जंजिरा किल्ल्याची मोहीम दि.८ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडली. नॅबचे २९ विद्यार्थी आणि ४ शिक्षिकांनी सहभाग घेतला. जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक श्री.चंद्रकांत साटम यांच्या नेतृत्वाखाली २९ स्वयंसेवकांच्या देखरेखीखाली ही मोहीम यशस्वी झाली. शुक्रवारी रात्री मुंबईहून प्रस्थान करून शनिवार सकाळी एकदरा येथील सम्राट हॉटेल या ठिकाणी हे सगळे विद्यार्थी आणि जिजाऊ प्रतिष्ठानचे स्वयंसेवक समूह एकत्रित जमले. चहा नाश्ता झाल्यानंतर हा चमू जंजिराकडे निघाला. या विशिष्ट मुलांच्या मोहिमेची माहिती जंजिरा किल्ल्यातील केंद्र पुरातत्व विभागाचे अधिकारी श्री. बी.जी येलीकर (संवर्धन सहाय्यक) यांना दिल्यावर त्यांनी आणि श्री. प्रकाश घुगरे आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य या मोहिमेस लाभले.त्याबद्दल त्यांचे आभार.

या मोहिमेत मुलांना हेलकावणाऱ्या बोटीत चढवणे आणि किल्ल्यावरील प्रवेशद्वारात उतरवणे हे आव्हानत्मक होते. हे आव्हानही सर्वांनी योग्य प्रकारे स्वीकारले . किल्ल्याचा महादरवाजा वरील लोखंडीकडी, टोकदार खिळे आपल्या हस्तस्पर्शाने पाहून दुर्ग भ्रमंती सुरू झाली. पुढे जंजिऱ्याला अजिंक्य ठेवणाऱ्या महाकाय तोफानां हस्तस्पर्शाने अनुभवत विद्यार्थी दुर्ग वास्तूंची माहिती घेत होते. प्राध्यापक डॉ. मृण्मयी साटम यांनी ऐतिहासिक दस्तावेदांचा
संदर्भ देत किल्ल्याच्या इतिहासाला उजाळा दिला.
या विद्यार्थ्यांनी किल्ल्याच्या दुर्ग अवशेष हे आपल्याला सोबतच्या स्वयंसेवकांच्या डोळ्यांनी न्याहळत किल्ल्याच्या ताटबंदीच्या फांजी वरून किल्याची प्रदक्षिणा पूर्ण केली.
परतीचा प्रवासात दुपारी पुन्हा मुलांना जंजिऱ्याच्या महादरवाज्यातील पायऱ्यांच्या जवळ हेलकावणाऱ्या होडीत सुरक्षित पणे चढवून छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जयघोषाने सर्वांनी जंजिरा किल्ल्याचा निरोप घेतला. जाता जाता घोगवणारा वारा,लाटांचा आवाज ऐकत ही सर्व मंडळी दंडराजपूरीच्या किनाऱ्यावर उतरली. सम्राट हॉटेल मालकांनी आयोजित केलेल्या सुग्रास भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला. त्यानंतर “खूप चांगला अनुभव मिळाला, स्वयंसेवक खूप चांगली काळजी घेतली.इतिहास खूप श्रवणीय होता, होडीतील प्रवास थोडा भीतीदायक पण तितकाच आनंददायी होता.अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यानी आणि शिक्षकांनी दिल्या. चंद्रकांत साटम यांनी मोहिमेत सहभागी आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करून मोहिमेचा समारोप केला.
जंजिऱ्याच्या ज्या ज्या वास्तूंनी हा विद्यार्थ्यांचा स्पर्श अनुभवला त्या वास्तू हा स्पर्श निरंतर आपल्या हृदयात ठेवेल यात शंका नाही.
*श्री.चंद्रकांत साटम*
जिजाऊ प्रतिष्ठान, दहिसर
Home ताज्या घडामोडी मुरुडच्या जंजिरा किल्ल्याने दृष्टीबाधित विद्यार्थ्यांचा वेगळाच स्पर्श अनुभवाला!!












