त्या शिक्षकांना निलंबित करण्याची व नाटे सरपंचांनी राजीनामा देण्याची ग्रामस्थांची मागणी
जैतापूर : राजापूर तालुक्यातील नाटे येथील नाटे नगर विद्या मंदिर शाळेतील पोषण आहारातील तांदूळ चोरी प्रकरणामुळे नाटे गावात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत या विषयावरून जोरदार खडाजंगी झाली. या प्रकरणात अडकलेले शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र जाधव आणि सहाय्यक शिक्षक नाना करे यांना तात्काळ निलबित करावे असा एकमुखी ठराव करत सरपंच संदीप बांदकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या ग्रामसभेत ग्रामस्थांनी केली.
या ग्रामसभे दरम्यानच आमदार किरण सामंत सभास्थळी पोहचले व त्यांनी अत्यंत संयमाने हा विषय हाताळला.
नाटे येथील नाटे नगर विद्या मंदिर शाळेतील पोषण आहारातील तांदूळ चोरी प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणामुळे नाटे गावाची बदनामी झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. या प्रकरणचा निषेध म्हणून सोमवारी या प्रकरणावर स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढत झाल्या प्रकाराचा तीव्र निषेध केला.
या विषयाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी नाटे ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्राम सभेत ग्रामस्थांनी सरपंच संदीप बांदकर यांना चांगलेच धारेवर धरले “पाच दिवस उलटले, पण तुम्ही ग्रामस्थांसमोर आला नाहीत; उलट दोषींना पाठीशी घालत आहात.” असा थेट आरोप करत सरपंचांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला यावेळी सभेचे वातावरण तापले आणि ग्रामस्थांनी सरपंचांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी झाली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य व शाळा समिती सदस्य मकरंद धाक्रस यांनी सभेत अत्यंत मुद्देसूद मांडणी करत स्पष्ट सांगितले “संस्थेच्या सभेतून ठराव करून आम्ही ग्रामस्थांच्या बाजूने उभे राहू. दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास पुढील निर्णय अधिक तीव्र असेल.” शिक्षकांचे निलंबन हे कायदेशीर पद्धतीने न्यायालयात ही टिकले पाहिजे यासाठी योग्य आणि कायदेशीर पद्धतीनेच कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेला ग्रामस्थांनी पाठींबा दिला.
तर राजापूर गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले हे देखील या प्रकरणाला जबाबदार असल्याचा आरोप करत यापूर्वी अनेक वेळा त्यांच्याकडे पोषण आहाराविषयी माहिती मागितली असता ती त्यांच्याकडून मिळाली नसून ते या शिक्षकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत त्यांनाही ग्रामस्थांनी चांगलेच फैलावर घेतले. ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांनी काही ग्रामस्थांची उध्दट वर्तन केले असल्याचा आरोप करत त्यांना चांगलेच धारेवर धरले. यानंतर यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांकडून शिक्षकांच्या निलंबनासंदर्भातील पत्र ग्रामसभेत वाचून दाखवले.
या सभेच्या दरम्यान आमदार किरण सामंत सभास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती संयमाने हाताळली. आ. सामंत यांनी संस्थेला निर्देश दिले की “संस्थेची तात्काळ बैठक घेऊन दोन्ही शिक्षकांना निलंबित करण्याचा ठराव मंजूर करावा. यावेळी काही पालकांनी शिक्षकांवर कारवाई झाल्यास मुलांच्या शिक्षणात अडथळा येईल अशी भीती व्यक्त केली. यावेळी आ. सामंत यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना सांगितले विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पर्यायी शिक्षकांची नेमणूक करावी अशा सुचना दिल्या. ग्रामस्थांची बाजू ऐकून घेत आ. सामंत यांनी या प्रकरणी अत्यंत सांमजस्याची भूमिका घेतली.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप बांधकर यांनी यातील दोषी शिक्षकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला असून त्यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली करत घोषणाबाजी केली. मात्र यावर त्यांचे कोणतेच प्रत्युत्तर न आल्याने आ. सामंत यांनी सरपंचांनी राजीनामा द्यावा की नाही द्यावा हा त्यांचा वैयक्तिक अधिकार असून आपण कायदेशीर प्रक्रियेने त्यांचा राजीनामा घेऊ शकता अशा सूचना केल्या. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या सभेला आमदार किरण सामंत, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले, ग्रामपंचायत सदस्य, शाळा समिती सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने रमेश लांजेकर, मनोज आडविलकर, मकरंद धाक्रस, नरेश साखरकर, संतोष चव्हाण आदींनी ग्रामस्थांच्या वतीने ठाम भूमिका मांडत घडल्या प्रकारातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
आ. सामंत यांनी सुचना केल्याप्रमाणे संस्था पदाधिकाऱ्यांची बुधवारी बैठक घेऊन त्या दोन्ही शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले व त्यानंतर सभा संपली.













