नारिंग्रे ते कोटकामते साईड पट्टी दुरुस्त करा

देवगड / प्रतिनिधी

 

भूमिगत विद्युत वाहिनीसाठी नारिंग्रे ते कोटकामते रस्त्याचा साईडपट्टीची खोदाई करण्यात आली आहे. या अरुंद रस्त्यावर साईडपट्टी नसल्याने व खोदाई कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे या गावातील एसटी वाहतूक दोन महिने बंद आहे. येत्या आठ दिवसांत या रस्त्याच्या साईडपट्टीचे काम पूर्ण करून हा रस्ता एसटी वाहतुकीसाठी सुसज्ज करावा. अन्यथा, नारिंग वासियांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नारिग्रे ग्रामस्थांनी देवगड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

 

दहिबाव- नारिग्रे पुलाचे रखडलेले काम व भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामासाठी नारिग्रे- कोटकामते रस्त्याची झालेल्या दुरावस्थेअभावी बंद झालेली एसटी वाहतुकीच्या प्रश्नाबाबत जाब विचारण्यासाठी नारिंग्रे सरपंच महेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ग – ामस्थांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देवगड कार्यालयाला धडक देत उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी माजी सरपंच श्रीकांत गावकर, प्रवीण राणे, सुनील मेस्त्री, राजीवकुमार भावे, आनंद कदम, सुनील बापट, नारायण घाडी, दशरथ धुवाळी, महेश घाडी, विलास शिंदे, अंकुश पाटील, दीपक राणे, शशिकांत राणे, शरद घाडी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. दहिबांव नारिंग्रे गाव जोडणाऱ्या पुलाचे काम तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंकडील रस्त्याचे काम गेले तीन चार महिने रखडले आहे. त्यामुळे एसटी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध, शेतकरी, महिला, रुग्ण यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच हा पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने पर्यायी कोटकामते मार्गाने होणारी एसटी वाहतूकही तेथील भूमिगत विद्युत वाहिनीसाठी रस्त्याच्या साईडपट्टीचे खोदकाम केल्याने रस्त्याची दुरावस्थेमुळे बंद आहे. परिणामी गावातील नागरिकांनी खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. याचा आर्थिक फटका गावातील गोरगरीब लोकांना बसत आहे. तसेच एसटी वाहतूक बंद असल्याने मोठी गैरसोयही होत आहे. पाऊस गेला तरीही रस्त्याची दुरूस्ती न केल्याने एसटी वाहतूक महिनाभर बंद आहे. रस्त्याची साईडपट्टी खोदाईसाठी आवश्यक असणारे ८७ लाख रूपये महावितरण विभागाने बांधकाम विभागाकडे भरले असतानाही बांधकाम विभाग मात्र खोदाईमुळे नादुरूस्त झालेल्या रस्त्याची दुरूस्ती का करत नाही, असा सवाल ग्रामस्थांनी शाखा अभियंता बी. आर. निखाळजे यांच्याकडे केला. साईडपट्टी दुरूस्तीचे काम केव्हा करणार? पुलाच्या रखडलेल्या कामाला सुरूवात करून पूलाचे काम पूर्ण केव्हा करणार, असे प्रश्न ग्रामस्थांनी विचारून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

 

कॉलेजला जाणाऱ्या नारिंग्रेमधील मुलांना पहाटे पाच वाजता घरातून बाहेर पडावे लागते व चालत दहिबांव येथे जावे लागते. अशीच परिस्थिती रुग्णांची असून त्यांना डॉक्टरकडे जाण्यासाठी दहिबांवला जावे लागते. मात्र त्यासाठी शेकडो रूपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे नारिग्रे- कोटकामते रस्त्याची दुरूस्ती तात्काळ करून एस्टी वाहतुकीसाठी रस्ता योग्य करावा. आठ दिवसांत एसटी वाहतूक सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा नारिग्रे ग्रामस्थांनी दिला. आठ दिवसात साईडपट्टीच्या दुरुस्तीचे काम करण्याचे आश्वासन श्री. निखाळजे यांनी नारिंग्रे ग्रामस्थांना दिले. यावेळी गावातील रस्त्यांबाबतचे निवेदन नारिग्रे ग्रामस्थांनी बांधकाम विभागाला दिले.

 

दरम्यान, नारिग्रे ग्रामस्थांनी देवगड आगारात स्थानकप्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांची भेट घेवून बंद असलेल्या एसटी वाहतुकीबाबत चर्चा केली. एसटी वाहतूक बंद असल्याने शालेय विद्यार्थी, रूग्ण यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे मिठबांव पुलमार्गे नारिंग्रे कॅन्टीनपर्यंत एसटी सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच वागदेवाडी देवगड, सडेवाडी देवगड, मालवण देवगड (वेळ १.३०), देवगड कणकवली (१०.२०), देवगड- मालवण (७.४५), देवगड मोर्वे (१२), देवगड आचरा (१.३०) व देवगड वागदेवाडी (६.१०) या गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.