– शिक्षक समिती तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांची मागणी
खेड : आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका 2 डिसेंबर रोजी होणार असून या निवडणूक प्रक्रियेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना विविध कर्तव्यांसाठी नियुक्त करण्यात आले आहे. खेड तालुक्यातही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक शिक्षकांसह अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण 16 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असून दुसरे प्रशिक्षण 23 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.
मात्र 23 नोव्हेंबर रोजीच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अखिल राज्यभर होत आहे. खेड तालुक्यातील मोठ्या संख्येने शिक्षक ही परीक्षा देणार असून अनेकांना त्याच दिवशी निवडणूक प्रशिक्षणासाठी हजर राहण्याचे आदेश मिळाले आहेत. अशा परिस्थितीत संबंधित शिक्षकांना परीक्षा देणे कठीण होणार असून त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, अशी भावना शिक्षक वर्तुळात व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडतर्फे या मुद्द्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण व सचिव धर्मपाल तांबे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले असून 23 नोव्हेंबर रोजीचे प्रशिक्षण रद्द करून ते शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी घेण्यात यावे, अशी संवेदनशील मागणी करण्यात आली आहे.
शिक्षक समितीने नमूद केले आहे की, प्रशिक्षणाचा उद्देश जितका महत्त्वाचा आहे, तितकाच शिक्षकांच्या सरकारी मान्य परीक्षेचाही आहे. त्यामुळे प्रशासनाने शिक्षकांच्या अडचणीची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या मागणीवर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे तालुक्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.









