अर्ज दाखल करण्यासाठी उरले अवघे तीन दिवस
राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवार १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. उमेवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी गुरूवारी प्रभाग क्रमांक ४ ‘ब’ मधून नगरसेवक पदासाठी राकेश सुनिल खटावकर यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
त्यामुळे गुरूवार अखेरपर्यंत यापुर्वी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी एक व गुरूवारी नगरसेवक पदासाठी एक असे दोन अर्ज दाखल झाले आहेत.
सोमवार १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारिख असल्याने या आता केवळ रविवार सुट्टीचा दिवस वगळता अर्ज दाखल करण्यासाठी तीनच दिवसांचा कालावधी उरला असून सोमवारी अंतिम दिवशीच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह दहा प्रभागांतील २० नगरसेवक पदासाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी नामनिर्देशन पत्र भरण्यास सोमवारी १० नोव्हेंबर पासून सुरुवात झाली असून १७ नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. असून अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत २१ नोव्हेंबर पर्यंत असून, निवडणूक चिन्हांचे वाटप २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी प्रभाग क्रमांक ४ ‘ब’ मधून नगरसेवक पदासाठी राकेश सुनिल खटावकर यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापुर्वी मंगळवारी ११ नोव्हेंबर रोजी लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी ज्योती सुनिल खटावकर रा. वरचीपेठ राजापूर यांनी हिंदू महासभेच्या वतीने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे गुरूवार अखेर राजापूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी एक व नगरसेवक पदासाठी एक अशा दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.












