वनतारासारख्या सुरक्षित ठिकाणी ओंकार हत्तीला पाठवून जनसामान्यांमध्ये असलेले भीतीचे वातावरण दूर करणार : ना. नितेश राणे

सावंतवाडी । प्रतिनिधी:ओंकार हत्तीला ‘वनतारा’ येथे पाठवण्यासाठीचे आदेश आहेत आणि त्या अनुषंगाने आपण आणि आमदार दीपक केसरकर वनताराच्या संपर्कात आहोत, असे स्पष्ट मत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. न्यायालयाचे स्पष्ट आदेश असल्याने, वनतारासारख्या सुरक्षित ठिकाणी ओंकार हत्तीला पाठवून जनसामान्यांमध्ये असलेले भीतीचे वातावरण आणि शेतकऱ्यांना होणारा त्रास कायमस्वरूपी संपुष्टात आणला जाईल, असे त्यांनी सांगितले.

सावंतवाडी येथील भोंसले सैनिक स्कूलच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सावंतवाडीत आले असता उपस्थित पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर आणि बीकेसीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोंसले आदी मान्यवर उपस्थित होते.

*हत्ती स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू:*

मंत्री नितेश राणे यांनी ‘ओंकार’ हत्तीच्या स्थलांतराबाबत माहिती दिली. ते म्हणाले, वनताराची टीम दोन वेळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन गेली आहे आणि आता लवकरच तिसऱ्यांदा जिल्ह्यात येईल. न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि लोकांना दिलासा मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

*भोंसले सैनिक स्कूल जिल्ह्यासाठी मानाचा क्षण:*

यावेळी बोलताना पालकमंत्री राणे यांनी भोंसले सैनिक स्कूलच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, संरक्षण मंत्रालयाची मान्यता प्राप्त असलेले भोंसले सैनिक स्कूल सावंतवाडीत उभे राहत आहे, हा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत मानाचा क्षण आहे. भविष्यात हे स्कूल सैनिकांसह अधिकारी तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. अच्युत सावंत-भोंसले आणि त्यांचे सहकारी संस्थेच्या माध्यमातून अत्यंत पारदर्शी काम करत आहेत, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

*राहुल गांधींवर टीका:*

राजकीय भाष्य करताना त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. “राहुल गांधी हे देशासाठी पर्यटक आहेत. पार्ट टाईम पॉलिटिशियनला बिहारच्या जनतेने नाकारले आहे,” अशी टीका त्यांनी केली. लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सीएम नितीश कुमार यांना पुन्हा संधी दिली आहे. तसेच, मुंबईतील काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करताना ते म्हणाले, मुंबईवर हिरव्यांचे राज्य आणण्यासाठी त्यांचा कार्यक्रम आहे. त्यांची भाषा जिहाद्यांची आहे. त्यामुळे मुंबईकर जनता त्यांना स्वीकारणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.