बांगलादेशच्या राजकारणात खळबळ उडवणारी मोठी बातमी समोर आली आहे. देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना इंटरनॅशनल क्राईम्स ट्रिब्युनलने मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. 2024 मध्ये बांगलादेशभर उसळलेल्या हिंसाचाराच्या घटना आणि त्यातून झालेल्या अनेक आंदोलकांच्या मृत्यूंसाठी त्यांना जबाबदार धरत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
2024 च्या हिंसक आंदोलनादरम्यान निशस्त्र आंदोलकांवर गोळीबाराचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप शेख हसीना यांच्यावर ठेवण्यात आला होता. या घटनांनंतर त्यांच्याविरोधात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर 2024 च्या जुलै महिन्यात त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्या भारतात आश्रयाला आल्या. आता या सर्व प्रकरणांवरील सुनावणी पूर्ण होताच न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा जाहीर केली आहे.
सध्या शेख हसीना या भारतात असल्यामुळे बांगलादेश सरकार त्यांचे प्रत्यर्पण व्हावे यासाठी भारतावर राजनैतिक दबाव आणण्याची शक्यता व्यक्त होत आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर दोन्ही देशांमध्ये पुढील पाऊल काय असेल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
—











