दारूसह २३ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल
एक्साईजच्या इन्सुली पथकाची कारवाई
बांदा : प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात सोमवारी चेकपोस्ट समोर कारवाई केली. या कारवाईत १३ लाख ४१ हजार ६०० रुपयांच्या दारूसह बॅरल व टेम्पो असा एकूण २३ लाख ७३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी गुजरात येथील दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. दिनेशभाई नवलसिंग संगाडा (२५) व रोहित अशोकभाई यादव (२२) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्यातून महाराष्ट्रात गोवा बनावटीची दारू वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती इन्सुली पथकाला मिळाली होती. त्यामुळे सोमवार सकाळपासूनच पथकाने सापळा रचला होता. गोव्याहून बांदा पोलिसांचा तपासणी नाका लिलया पार करून सिंधुदुर्गच्या दिशेने येणारा ट्रक (जीजे ०१ एचटी ०७९४) वाहतुकीसाठी तपासणीसाठी थांबविण्यात आला. यावेळी ट्रकमधील बॅरलमध्ये केमिकल पावडरच्या आड लपून ठेवलेले गोवा बनावटीचे दारूचे बॉक्स निदर्शनास आले. यात एकूण २१५ बॉक्समध्ये १० हजार ३२० दारूच्या बाटल्या आढळून आल्यात. बाजारभावाप्रमाणे दारूची किंमत १३ लाख ४१ हजार ६०० रुपये इतकी आहे. तसेच बॅरल व ट्रक असा एकूण २३ लाख ७३ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ट्रक चालक व क्लिनर यांना ताब्यात घेण्यात आले.
सदर कारवाई जिल्हा अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक विवेक कदम, धनंजय साळुंखे, जवान दीपक वायदंडे, रणजीत शिंदे, अभिषेक खत्री यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम करीत आहेत.













