भौगोलिक कामांसाठी ३४ कोटींचा खर्च

खेड(प्रतिनिधी)कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शेकडो कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या मदतीने मान्सूनपूर्व कामे पूर्ण केली आहेत. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वे मार्गावरील भौगोलिक कामांसाठी ३४ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी दिली. रेल्वे मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये सर्वाधिक घट झाल्याचेही स्पष्ट केले.

 

 

 

 

गणेशोत्सवात लाखोंच्या संख्येने चाकरमानी डेरेदाखल होतात. चाकरमान्यांच्या मार्गात कोणत्याही प्रकारचे ‘विघ्न’ येवू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने मान्सूनपूर्व कामावर सर्वाधिक भर दिला आहे.

 

 

 

 

मार्गावरील बोगद्यांची पाहणी करत देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण केली. पावसाची नोंद सांगणारे पर्जन्यमापकही बसवण्यात आल्याचे सांगण्यात आले. पूरसदृश परिस्थितीत आवश्यक माहिती देण्यासाठी पुरमापक यंत्रणाही बसवण्यात आली आहे. वाऱ्याचा अचूक वेग मोजण्यासाठी अॅनिमोमीटर्सही बसवण्यात आले आहेत. मागील १० वर्षात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये कमालीची घट झाली आहे. कोकण मार्गावर तत्परतेने अन् कार्यक्षम पद्धतीने कामे पूर्ण करण्यावर प्राधान्य देण्यात आल्याचेही शेवटी सांगितले.