निसर्गाने मांडलेला एक मनमोहक डाव, पर्यटकांस भुरळ पडणारे असे “सावडाव”

मित्रांनो, निसर्ग! निसर्ग हे कोकणाला मिळालेले सर्वात मोठे वरदान. मानव आणि निसर्ग (पर्यावरण) या दोघांचा खूप जुना संबंध आहे. या निसर्गातून मानवाला बऱ्याच गोष्टी मिळतात. त्या सर्व गोष्टींचा उपयोग मानव आपल्या जीवनामध्ये करतो.

ईश्वराने या निसर्गाची रचना अत्यंत चांगल्या प्रकारे केली आहे. निसर्ग म्हणजे – सृष्टी होय. ही सृष्टी पृथ्वी, पाणी, अग्नी, आयु आणि आकाश या पाच तत्वांनी बनली आहे. मानवाचा जन्म या निसर्गाच्या पंच तत्वातूनच झाला आहे. म्हणून त्याचे जीवन हे या पाच तत्वांवर अवलंबून आहे.
निसर्ग हा एक चित्रकार आहे. कारण हा निसर्ग दररोज रम्य चित्र रंगवतो आणि सगळ्यांना प्रेरणा देतो. जसे कि खोल दऱ्या, निर्मल आणि झुळझुळ वाहणारे झरे, अथांग सागर आणि सरोवरे, घनदाट जंगल, उत्तुंग आणि विशाल पर्वत, दुधासारख्या पांढऱ्या शुभ्र पाण्याने खळखळून वाहणारे धबधबे, वार्याच्या झोक्यावर झुलणारी हिरवीगार शेते, डोंगरा आडून उगवणारा सूर्य, सकाळची सूर्याची कोवळी किरणे, संध्याकाळी सूर्य मावळताना तांबूस होत जाणारे आकाश ही सर्व काही निसर्गाची खूप मोठी किमया आहे. हे सर्व निसर्गाने मानवाला विशेषतः या गावाला दिलेली देणगी आहे. आणि याच तंतोतंत उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील हा सावडाव गाव.

निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेले, मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली शहरापासून मुंबईच्या दिशेने साधारण 6 ते 7 की.मी आणि नांदगाव गावापासून गोव्याच्या दिशेने साधारण 6 किमी अंतरावर सावडाव फाटा म्हणजेच सावडाव गावाकडे जाणारा मार्ग सुरू होतो.पर्यटकांचे आणि प्रत्येक वाटसरुचे स्वागत करणारी भव्य कमान,कधी घनदाट जंगल,हिरवागार निसर्ग, डोंगर दरीतून वाट कढणारी नदी, ओढे, वाऱ्यावर झुलणारी हिरव्यागार शेती आणि त्यावर सोनेरी साज असलेली पिके. आजूबाजूला गर्द झाडीतून वाट काढत काढत मुख्य मार्गापासून गावात जाणारा रस्ता, आणि रस्त्यालगत वसलेल्या वाड्या, मधेच एखादं उंच डोंगरावर वसलेलं कौलारू घर, प्राथमिक शाळा, दप्तर पाठीवर घेऊन चालत किंवा सायकल ने शाळेत जाणारी मुले, आणि विशेष म्हणजे अजस्त्र खडकावरून खाली कोसळणारा दुधासारख्या पांढऱ्या शुभ्र पाण्याने खळखळून वाहणारा धबधबा, हे सारं पाहताना खर निसर्ग सौंदर्य काय असत. हे खऱ्या अर्थाने जाणवत.
या गावात मुख्यतः श्री पावणाई आणि श्री रामेश्वर अशी दोन मंदिरे आहेत. दोन्ही मंदिरे ही भाविकांच्या मनाची श्रद्धास्थान असलेली ही मंदिरे. कणकवली तालुक्यात जागृत देवस्थाने म्हणून प्रसिद्ध आहेत. या गावच्या वार्षिक जत्रोत्सव… या दिवशी अत्यंत भक्ती भावात संपन्न होतो.

सुमारे १४७१.०० हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणने नुसार एकूण १४४० इतकी आहे तर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या या गावात एकूण ३७५ कुटुंबे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मुख्य राष्ट्रीय महामार्गावापासून साधारण ३ ते ४ किमी असलेल्या या गावात दळणवळणासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसे ची सुविधा देखील आहे.
सध्या या गावाचे सरपंच पद सौ. वारंग मॅडम तर उपसरपंच पद श्री दत्ता काटे हे भूषवत आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली गावाने अनेक उद्दिष्ट लीलया पार करून अनेक पुरस्कार ही प्राप्त केले आहेत. यातच मुख्यतः २०१८ साली याच गावाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा मान या ग्रामपंचायतीला मिळाला आणि या मुळे गावचा कारभार पेपरलेस झाला असून ई-गव्हर्नर च्या ३३ सेवा गावातच मिळतात.

या गावचे मुख्य आकर्षण म्हणजे “सावडाव धबधबा”.
सावडाव आणि माईण गावाच्या डोंगरमाथ्यावर उगम झालेली ही नदी. डोंगर कपारी,कातळावर साठलेले पावसाचे पाणी एकत्र होत पुढे मोठा प्रवाह होतो. पुढे हा प्रवाह एका अजस्त्र खडकावरून खाली कोसळतो आणि सावडावच्या सुंदर नयनरम्य धबधब्याचा प्रवास गर्द वनराईतून सुरू होतो.सुमारे ६० ते ७० फूट रुंद आणि ३० फूट उंचीचे हे कातळ जेव्हा धबधब्याखाली येते तेव्हा जणू पांढऱ्या शुभ्र दुधाचा घट कोसळतोय की काय असा भास होतो. धबधब्याच्या वरच्या बाजूला अत्यंत संथ वाहणारे हे पाणी जेव्हा मोठ्या खडकावरून खाली कोसळते तेव्हा ते चित्र मनाच्या आतील कप्प्यात कायमस्वरूपी बंद करून ठेवण्या इतपत सुंदर आणि नेत्रदीपक, गर्द वनराई, त्यावर पसरलेल्या हिरव्या वेली, रंगीबेरंगी फुल,त्यावर बागडणारी फुलपाखरे, पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्यात या धबधब्याचे खळखळून गीत गाणे सार काही स्वप्नवत आहे. शिवाय धबधब्याच्या डाव्या बाजूला मोठी गुहा आहे, एकाच वेळी किती तरी लोक राहतील इतकी मोठी ही गुहा आहे, याच बरोबरधबधब्याच्या मधेभागी कित्याक वर्ष डौलाने उभं असलेलं हे झाड, या नदीला कितीही पूर आला तरी ते मोडत नाही किंवा वाकतही नाही. ते अगदी कणखरपणे आणि जिद्दीने तसच वर्ष्यानुवर्षं आणखी मजबूत होत आहे.
निसर्ग सौंदर्याबरोबरच फेसाळत खाली कोसळणारा हा धबधबा जिल्ह्यातील तसेच बाहेरील पर्यटकांचे आकर्षण आहे. तसेच सुप्रसिद्ध अभिनेते श्री भाऊ कदम हे ही याच गावचे सुपुत्र. अस हे आपलं सावडाव गाव अगदी आई पावणाई आणि स्वामी रामेश्वराच्या छत्रछायेखाली दिवसेंदिवस बहरत आहे..

तुम्ही ही एका नक्की भेट द्या..

अमित प्रभाकर चाळके
बेळणे खुर्द,कणकवली