कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वागदेत अपघात ; सुदैवानं जिवीतहानी टळली

 

मात्र रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोचे व प्रवासी शेडचे मोठे नुकसान

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर वागदे, डंगळवाडी येथील तीव्र उतारावर कसाल येथून कणकवलीच्या दिशेने जाणारा कंटेनर क्रमांक ( एम. एच. ४६ एच १४७० ) वरील चालकाचे ताब्यातील कंटेनरवरील नियंत्रण सुटले व अपघात झाला. नजीकच रस्त्यावर उभा करून ठेवलेल्या छोटा हत्ती टेम्पोला कंटेनरची जोरदार धडक बसली. तसेच गतवर्षी ग्रामस्थानी श्रमदान करून बांधलेल्या बस स्टॉपलाही धडक बसल्याने मोठे नुकसान झाले आहे. मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु सदरचा कंटेनर रस्त्याच्या साईड पट्टी वरुन कलंडताना थोडक्यात बचावला नाहीतर महामार्ग चौपदरीकरणात बाधीत झालेल्या परब यांच्या घरावर तो पलटी होण्याची दाट शक्यता होती.

दरम्यान, या घटनेची रात्री उशिरापर्यंत कणकवली पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. त्यामुळे अधिक माहिती समजू शकलेली नाही. या घटनेत कंटेनर चालक किरकोळ जखमी झाल्याचे समजते.