प्रमोद रावराणे यांचे आयोजन
वैभववाडी l प्रतिनिधी : वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालय व डेरवण येथील वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 19 ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराणा प्रतापसिह शिक्षण संस्थेचे स्थानिक कमिटी सचिव प्रमोद रावराणे यांच्या विशेष प्रयत्नांतून हे शिबिर होत आहे.
या शिबिरात विविध आजारांची तपासणी व आवश्यक असल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी जनरल सर्जन, स्त्री रोग तज्ञ, जनरल फिजिशियन, अस्थिरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, नाक,कान, घसा तज्ञ आदी डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहे. या शिबिरासाठी येणाऱ्यांनी आपले जुने रिपोर्ट तसेच चालू औषधे घेऊन यावीत. तसेच केशरी व पिवळे रेशन कार्ड असल्यास त्यांची शस्त्रक्रिया मोफत होणार आहे. हे शिबिर सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत होणार आहे.
या शिबिराचा लाभ तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महाराणा प्रतापसिह शिक्षण संस्थेचे सचिव प्रमोद रावराणे यांनी केले आहे.







