देवरूख नगरपंचायत निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण; ८ अर्ज अवैध; ८० अर्ज वैध

नगराध्यक्षपदाचे २ तर नगरसेवक पदाचे ६ अर्ज अवैध
नगराध्यक्षपदासाठी ७ तर नगरसेवक पदासाठी ७३ अर्ज वैध

देवरूख:

संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जांची मंगळवारी छाननी करण्यात आली. यामध्ये ८ अर्ज अवैध ठरले आहेत. यात नगराध्यक्षपदाचे २ तर नगरसेवक पदाच्या ६ अर्जांचा समावेश आहे. तर ८० अर्ज वैध ठरले आहेत. यात नगराध्यक्षपदासाठी ७ तर नगरसेवक पदासाठी ७३ अर्जांचा समावेश आहे. आता अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शुक्रवारी किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात. यावर निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार उभे राहतात. हे स्पष्ट होणार आहे.

येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर सादर झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननीची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली. निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमृता साबळे व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत छाननीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये अधिकृत उमेदवाराला पर्यायी उमेदवाराने भरलेले अर्ज यातील मुख्य उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने पर्यायी उमेदवाराचे अर्ज अवैध ठरवण्यात आले.

यात नगराध्यक्षपदासाठी महायुतीतर्फे भाजपकडून मृणाल शेट्ये व श्रध्दा इंदुलकर यांनी अर्ज भरला होता. मात्र पक्षाकडून एबी फाँर्म न मिळाल्याने श्रध्दा इंदुलकर यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला तर मृणाल शेट्ये यांचा अर्ज पक्षाचा एबी फाँर्म असल्यामुळे वैध ठरवण्यात आला आहे. तसेच आपकडून नगराध्यक्षपदासाठी दिक्षा खंडागळे व अनघा कांगणे यांनी अर्ज भरला होता. मात्र पक्षाकडून दिक्षा खंडागळे यांना एबी फाँर्म देण्यात आल्यामुळे त्यांचा अर्ज वैध ठरला तर अनघा कांगणे यांना पक्षाकडून एबी फाँर्म न मिळाल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला.

नगरसेवक पदासाठी प्रभाग क्र. १ मधून जान्हवी मोरे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून भरलेला अर्ज पक्षाकडून एबी फाँर्म न मिळाल्याने अवैध ठरला तर त्यांनी अपक्ष भरलेला अर्ज वैध ठरला. प्रभाग क्र. ३ मधून तुकाराम किर्वे यांनी भाजपकडून भरलेला अर्ज पक्षाकडून एबी फाँर्म मिळाल्याने अवैध ठरला तर त्यांचा अपक्ष अर्ज वैध ठरला. प्रभाग क्र. ९ मधून कविता नार्वेकर यांनी भाजपकडून भरलेला अर्ज पक्षाकडून एबी फाँर्म न मिळाल्याने अवैध ठरला तर त्यांचा अपक्ष अर्ज वैध ठरला. प्रभाग क्र. १० मधून श्रुती रेवणे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज भरला होता मात्र पक्षाकडून एबी फाँर्म मिळाला नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला.

प्रभाग क्र. १४ मधून मनस्वी आंबेकर यांनी भाजपकडून अर्ज भरला होता. त्यांना पक्षाकडून एबी फाँर्म न मिळाल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. तर त्यांचा अपक्ष अर्ज वैध ठरला. प्रभाग क्र. १५ मधून प्रणाली विंचू यांनी शिवसेना शिंदे गटाकडून भरलेला अर्ज पक्षाकडून एबी फाँर्म न मिळाल्याने अवैध ठरला तर त्यांचा अपक्ष अर्ज वैध ठरला आहे. अशाप्रकारे नगराध्यक्षपदासाठी २ अर्ज अवैध ठरले तर नगरसेवक पदासाठी ६ अर्ज अवैध ठरले आहेत. आता निवडणुक रिंगणात किती उमेदवार राहतात. यासाठी अर्ज मागे घेण्याच्या दिवसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काही अपक्ष उमेदवार आपले अर्ज मागे घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.