सावंतवाडी । प्रतिनिधी : उत्तर मुंबई येथे आयोजित खासदार क्रीडा महोत्सव २०२५ मध्ये सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावचा उदयोन्मुख बुद्धिबळपटू क्षितिज श्रीराम गावडे याने १२ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक मिळवून उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. या विजयामुळे चौकुळ गावासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
वॉर्ड नंबर ३५, मुंबई उत्तर विभाग यांच्या वतीने आयोजित या बुद्धिबळ स्पर्धेत मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले होते. या गटात सहा फेऱ्यांमधून २७ स्पर्धक अंतिम फेरीत आले होते. अत्यंत कठीण आणि गुणवान प्रतिस्पर्धकांमध्ये क्षितिजने सुरुवातीपासूनच प्रभावी खेळ दाखवला. त्याने शांतता, अचूक डावपेच आणि उच्च दर्जाची एकाग्रता ठेवत सर्व्होत्तम कामगिरी केली आणि अखेरीस निर्णायक डावात विजय मिळवत विजेतेपद आपल्या नावे केले.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते क्षितिज श्रीराम गावडे याचा चषक देऊन सत्कार करण्यात आला, हा क्षण चौकुळ गावासाठी अत्यंत अभिमानाचा ठरला.
चौकुळ गावाचा गौरव:
सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावची ओळख पूर्वी सभापती रामभाऊ गवडे यांनी करून दिली आहे. सध्या पर्यटन आणि शिक्षण क्षेत्रात या गावातील अनेक डॉक्टर, प्राध्यापक नावलौकिक मिळवत आहेत. गेल्या ५ वर्षांत या गावाने विविध क्रीडा प्रकारात नाव कमावले आहे. यापूर्वी याच गावातील एका मुलाने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. आता बुद्धिबळात क्षितिज गावडे याच्या रूपाने चौकुळ गावाचा आणखी एक गौरव झाला आहे.
क्षितिजच्या या घवघवीत यशामुळे ग्रामस्थ, शिक्षक आणि क्रीडा प्रेमींनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल भविष्याची आशा व्यक्त करत त्याला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. क्षितिजने आपल्या कर्तृत्वाने चौकुळ गावाचे नाव अभिमानाने उजळले आहे.













