कोणावरही टीका करणार नाही : खेळीमेळीच्या वातावरणात लढवणार निवडणूक
वेंगुर्लेवासीय शिवसेनेच्या मागे ठामपणे उभे राहतील : जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर
वेंगुर्ले l दाजी नाईक :राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे आणि राज्यातील जनतेसाठी सर्वजण एक दिलाने काम करत आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या महायुतीमध्ये असणाऱ्या भाजप किंवा राष्ट्रवादी असेल यांच्यावर कोणत्या ही प्रकारची टीका टिपणी करणार नाही. फक्त वेंगुर्ले शहराच्या विकासासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वात काय काम केली आणि भविष्यात काय काम करणार आहोत याचा लेखाजोगा मतदारांसमोर मांडणार आहोत. आणि शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत कस आहे हे दाखवून देणार आहोत. निवडणुकीत हाच आमचा अजेंडा असणार आहे, वेंगुर्लेच्या विकासासाठी आम्ही काम करतो हे सर्वांना माहीत असल्याने वेंगुर्लेवासीय शिवसेनेच्या मागे ठामपणे उभे राहतील आणि आमचे सर्व उमेदवार निवडून देतील असा विश्वास शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या अधिकृत २१ उमेदवारांची नावे जाहीर केली.
वेंगुर्ले येथील शिवसेना शाखेमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. वालावलकर यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर उपस्थित होते.
*नागेश उर्फ पिंटू गावडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार*
शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी यावेळी वेंगुर्ले नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उभे केलेल्या नगराध्यक्ष सह नगरसेवकांची अधिकृत नावे यावेळी जाहीर केली. यामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश उर्फ पिंटू गावडे, नगरसेवक पदाचे उमेदवार
लीना म्हापणकर, आदित्य प्रभूखानोलकर, तृप्ती माणगावकर, सुरेंद्र चव्हाण, सुचित्रा परब, उमेश आरोलकर, आरती वालावलकर, बुधाजी येरम, सानवी गावडे, सुनील डूबळे, रोहिणी लोणे, शंकर गावडे, राशी कुबल, बाळकृष्ण हुले, चित्रांजली केरकर, दत्ताराम नार्वेकर, श्रद्धा बाविस्कर, विलास जाधव, मंजिरी मोरे, प्रसाद बाविस्कर या २१ जणांचा समावेश आहे.
*पाठपुराव्यामुळे शिवसेनेने अनेक विकास कामे लावली मार्गी*
वेंगुर्ले शहरात गेले चार-पाच वर्षात आम्ही सातत्याने आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न मिटवला. गंजलेली पाईपलाईन बदलून घेतली, नारायण तलाव विषय हाती घेतला असून तो प्रकल्प ही मार्गी लागेल. त्या कामासाठी पहिल्या टप्प्यात ७० लाख रुपये प्राप्त झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील अडीच कोटी रुपये निधी लागणार आहे. तोही आम्ही आणणार आहोत. बंदर येथे जेटी चे काम सुरू असून लवकरच पाणबुडी प्रकल्प ही येणार आहे. गवळीवाडा येथील घरांचा प्रश्न अनेक वर्ष रखडला होता तो मार्गी लागला. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तो प्रश्न अजून मिटलेला नाही. सातबारावर नाव येणे ही बाब शिल्लक आहे तीही लवकरच पूर्ण करता येईल असे त्यांनी सांगितले. यासह शहरातील रस्ते पाणी अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले. त्यासाठी सातत्याने कामांचा पाठपुरावा केला. हे वेंगुर्लेतील नागरिकांनी जवळून पाहिले आहे.
*उदय सामंत, निलेश राणे, दीपक केसरकर असणार स्टार प्रचारक*
वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेतर्फे स्टार प्रचारक म्हणून उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजू परब हे प्रचारासाठी येणार आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची आणि विकासाचे कोणते व्हिजन पक्षाचे आहे त्याची माहिती ते मतदारांना सभांच्या माध्यमातून देणार आहेत, असेही श्री. वालावलकर यांनी सांगितले.












