सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान जनजागृती पदयात्रा 

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा सहभाग : मतदारांना मतदानाचे आवाहन

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने, मतदानाचे महत्त्व आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शहरात भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी या पदयात्रेत सक्रिय सहभाग घेत मतदारांना आपला राष्ट्रीय हक्क बजावण्यासाठी व लोकशाही बळकट करण्याकरिता मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथून या जनजागृती पदयात्रेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी एका सेल्फी स्टॅण्डचेही अनावरण करण्यात आले.

ही पदयात्रा शहरातून मिलाग्रीस हायस्कूल चौक, सालईवाडा रस्ता, जयप्रकाश चौक, गांधीचौक मेनरोडने, नगरपरिषद कार्यालय समोरुन, कॉलेज रोड, रामेश्वर प्लाझा मार्गे पुन्हा जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे समारोप झाली.

या जनजागृती अभियानात श्री पंचम खेमराज महाविद्यालय, राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि कळसुलकर इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या सर्वांनी ‘मतदान करा’ असे संदेश देणारे फलक हातात घेऊन जोरदार घोषणा दिल्या.

संपूर्ण पदयात्रेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पायी चालत मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे, वैभव कुमार अंधारे आदींसह प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. हा जनजागृती उपक्रम सावंतवाडीतील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.