वनविभागाने चर्चा केल्यावर १५ ऑगस्टचे आमरण उपोषण स्थगित
सावंतवाडी, प्रतिनिधी : माजगाव परिसरात लाल तोंडाची व काळ्या तोंडाची माकडे, गवारेडे, शेकरू, नीलगाय यांसह अन्य वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला असून, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. माकडांकडून घरांच्या छतांवर, अंगणात धुडगूस घातला जात असून महिला, लहान मुले व वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना न केल्यास १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सावंतवाडी येथील वनविभाग कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता मात्र १३ ऑगस्ट रोजी वनक्षेत्र अधिकारी सुहास पाटील यांनी माजगाव ग्रामपंचायत येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आणि यादरम्यान ग्रामस्थांनी आपल्या मागण्या मांडल्या .
माजगाव परिसरातील माकडांच्या टोळ्यांमुळे शेतीतील पिके, भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान होत असून माकडांकडून घरांवरील कौले, पत्रे, विजेच्या तारा आणि पाण्याच्या टाक्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता वनविभाग आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे बाबू सावंत यांनी सांगितले. वनक्षेत्रात फळझाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करून ती जगविणे, वन्यप्राण्यांना अन्न मिळेल अशा झाडांची लागवड करणे, पाणवठे सुस्थितीत ठेवणे तसेच आवश्यक ठिकाणी कूपनलिका व पंपाची व्यवस्था करणे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“सगळ्या गोष्टी कागदावर आहेत; प्रत्यक्षात काहीच दिसत नाही. वनविभागाने फळझाडे लावून ती जगवली पाहिजेत. जंगलात अन्न आणि पाण्याची व्यवस्था झाली तर वन्यप्राणी गावाकडे येण्याचे प्रमाण कमी होईल,” असे बाबू सावंत यांनी सांगितले. वनक्षेत्रात किती झाडे लावण्यात आली आणि त्यापैकी किती जगली, याचे सर्वेक्षण वनविभागाने करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
माजगाव परिसरातील बंधारे वाळू आणि गाळाने भरले असून ते सुस्थितीत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात पशुधन असल्याने गुरे वनक्षेत्रात चरायला जात होती. त्यामुळे जंगलातील काही भाग मोकळा राहत होता. आता पशुधनाचे प्रमाण कमी झाल्याने रानमोडी वाढली असून जंगलातील अनेक वाटाही बंद झाल्या आहेत. त्यामुळे गवारेडे आणि अन्य वन्यप्राण्यांना जंगलात अन्न मिळत नसल्याने ते गावाकडे येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.वनविभागाची नियमावली जाचक असल्याने शेतकऱ्यांना शेतसंरक्षण करताना अनेक अडचणी येत आहेत. “शासनाच्या नियमांनुसारच सर्व काही करत गेलो तर आमचा संसार चालणार नाही,” अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.
वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तयार करून रात्रीच्या वेळी गस्त घालावी, वन्यप्राणी गावाच्या दिशेने येत असल्यास नागरिकांना सावध करावे आणि संवेदनशील भागांचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी आहे. शेतकऱ्यांना शेतसंरक्षणासाठी कायदेशीर व सुरक्षित उपाययोजना उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
माजगाव परिसरातील वनसंज्ञेचा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. १९७५ पासून वनसंज्ञेमुळे स्थानिक नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रश्नावर शासनस्तरावर पाठपुरावा करून वनसंज्ञेबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी संपूर्ण गावाच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारून त्यांच्या मागण्या वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले . नागरिकांच्या सर्व तक्रारी व मुद्दे वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन शासनाकडे पाठविण्यात येतील, असेही सांगण्यात आले. गणेश चतुर्थीपर्यंत मोरडोंगरी परिसरातील आवश्यक साफसफाई करण्याचे आश्वासन वनविभागाकडून देण्यात आले तेव्हा ग्रामस्थांनी उपोषण स्थगित करण्याचे मान्य केले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत, जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, स्वागत नाटेकर, माजगाव उपसरपंच रिचर्ड डमेलो , अशोक दळवी , जितू गावकर पंचायत समिती सदस्य , चराठा सरपंच प्रचिती कुबल व सहकारी ग्रामस्थ, इन्सुली मतदारसंघाचे जि.प. सदस्य नितीन एकनाथ राऊळ, पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे आदी उपस्थित होते.












