सावंतवाडीच्या शेतकऱ्यांनी त्वरित लाभ घ्यावा असे आवाहन
सावंतवाडी । प्रतिनिधी :यंदाच्या हंगामात तब्बल सात महिने पाऊस सुरू राहिल्याने भात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शासनाने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत हमी भावाने भात पीक खरेदी करण्याची योजना सुरू केली आहे. त्यानुसार, आता सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून भात खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी तालुक्यातील भात पीक हमीभावाने विकू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी त्वरित संघाच्या सावंतवाडी कार्यालयात रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन केले आहे. खरीप हंगाम २०२५-२६ साठी भात खरेदीची नोंदणी सुरू झाली आहे.
नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे. यामध्ये २०२५-२६ चा भात पिकपेरा नोंदीचा सातबारा, आधारकार्डची झेरॉक्स, चालू व्यवहार असलेल्या पासबुकची झेरॉक्स आणि आधार लिंक असलेला मोबाईल घेऊन येणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे यंदाच्या हंगामात भाताला प्रति क्विंटल २३६९ रुपये इतका चांगला हमीभाव मिळणार आहे. खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे आणि सचिव महेश परब यांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांनी त्वरित कागदपत्रांसह सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन शासनाच्या हमीभावाचा लाभ घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.










