मुंबईत बसून इथे मदत कशी करणार? – सुराज्य अभियानाचा प्रश्न !
*सिंधुदुर्ग* – दरवर्षी फळमाशी, तुडतुडा अशा अनेक आजारांनी आंबा पिकाचे अतोनात नुकसान होत असतांना गिर्ये-रामेश्वर आंबा संशोधन केंद्रात काहीही उपयुक्त काम होत नाही. पाच कोटीहून अधिक पगार गेल्या १० वर्षांत दिला जाऊनसुद्धा संशोधन काही नाही आणि आंबा उत्पादकांना काहीही फायदा होत नाही. याविषयी गेल्या वर्षीपासून आवाज उठवून सुद्धा ऐन आंबा पिकाचा हंगाम सुरू होतानाच गिर्ये–रामेश्वर येथील आंबा संशोधन केंद्रातील अधिकारी ८ दिवस गायब आहेत. संशोधन केंद्राला संपर्क करण्याची सुविधाच नाही. फोन करायचा असेल, तर अधिकार्यांच्या वैयक्तिक नंबरवरच करायचा, असे चुकीच्या पद्धतीने कामकाज सुरू असल्याचे सुराज्य अभियानाचे समन्वयक डॉ. रविकांत नारकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सिंधुदुर्गनगरीत पत्रकार भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला देवगड तालुक्यातील आंबा व्यापारी श्री. दीपक वारीक, श्री. विकास दीक्षित, श्री. रवींद्र कारेकर, श्री. अशोक करंगुटकर, ,श्री श्रीकृष्ण दुधवडकर, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत सद्गुरु सत्यवान कदम, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष ॲड्. वीरेंद्र इचलकरंजीकर, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पाटील हे उपस्थित होते.
या वेळी बोलताना श्री. श्रीकृष्ण दुधवडकर म्हणाले की, आम्ही गिर्ये–रामेश्वर आंबा संशोधन केंद्रातील अधिकारी श्री. मुंज यांना संपर्क केला असता त्यांनी सध्या मुंबईत आहेत आणि केंद्रात कोणीही नाही. त्यामुळे आंबा पिकाबद्दल काही अभ्यास हवा असल्यास, तो डॉ. मुंज परत आल्यानंतरच मिळेल असे सांगितले. या वेळी श्री. दीपक वारिक यांनी फळकिडी बाबत कुठले औषध आता फवारायचे असे विचारल्यावर श्री. मुंज यांनी एरवी जी मारली जातात तीच औषधे मारा असे मोघम उत्तर दिले.
सध्या अस्तित्वात असलेल्या औषधांचा प्रभाव फळमाशीवर पडत नाही ही वस्तुस्थिती असताना आणि याविषयी पत्रव्यवहार सुद्धा केलेला असताना, अशी उत्तरे दिली जात आहेत हे गंभीर आहे. अशातून सिंधुदुर्गाच्या महत्त्वाच्या ओळखीपैकी एक ओळख असलेला आंबा पीक नष्ट होईल अशी भीती यावेळी त्यांनी व्यक्त केली.
सुराज्य अभियानाचे श्री. भास्कर खाडीलकर यांनी या वेळी बोलताना आंबा पिकावर येणारे आजार आणि एकूणच हंगामात घ्यायची काळजी याविषयी एक कायमस्वरुपी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध असायला हवा, अधिकारी बदलला की फोन नंबर बदलला असे व्हायला नको. याशिवाय कोणती औषधे वापरायची, ती कशी वापरायची, ती वापरून बाग कशी तयार होते, याची नमुना बाग ७३ एकरच्या या संशोधन केंद्रात निर्माण होणे ही काळाची गरज आहे. यासाठी आवश्यक असेल, तर आंदोलन करू, असे त्यांनी सांगितले.












