हिंदळे ग्रामदैवत श्री देव काळभैरव जत्रोत्सवाची उत्साहात सांगता!

हजारो भाविक श्रींच्या चरणी नतमस्तक.

मसुरे | झुंजार पेडणेकर देवगड तालुक्यातील हिंदळे गावचे ग्रामदैवत श्री देव काळभैरव जत्रोत्सवाची शुक्रवारी सायंकाळी उत्साहात सांगता झाली. देव दिवाळी दिवशी भाविकांना थेट गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येत असल्याने दिवसभरात हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. दुपारी भाविकांची दर्शन रांग मंदिराबाहेरील रस्त्यापर्यंत आली होती. भर उन्हाची परवा न करता भाविकांनी श्रीचे दर्शन घेतले.

देव दीपावली वार्षिक महोत्सवास १६ नोव्हेंबर पासून सुरवात झाली होती.संध्या. डाळप, भजन, रात्रौ १० वा. पुराण वाचन, पालखी सोहळा व किर्तन

किर्तनकार ह.भ.प. रंगनाथ साने (आचरा) यांनी सादर केले. शुक्रवारी २१ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजल्या नंतर ओटी भरण्याचा कार्यक्रमास प्रारंभ झाला. संध्याकाळी ७ वा. उत्सवाची सांगता झाली. जत्रोत्सवा निमित्त मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जत्रोत्सवासाठी बहुसंख्या चाकरमानी गावात दाखल झाले होते. माहेरवाशींणी तसेच महिला वर्गाने ओटी भरण्यासाठी गर्दी केली होती. जत्रोत्सव कालावधीत दररोज रात्री विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे देवालयात आयोजन करण्यात आले होते. जत्रोत्सवात हंगामी हॉटेल आणि मिठाई व्यावसाईक यांनी आपली दुकानें थाटली होती. मालवणी खाज्याचा सुगंध जत्रा परिसरात पसरला होता.जत्रोत्सवानिमित्त मंदिराच्या पुढील बाजूस भव्य असे प्रवेशद्वार उभारण्यात आले होते. सायंकाळी जत्रोत्सवाची सांगता झाली.