रिक्षाचे मोठे नुकसान : सुदैवाने प्रवासी बचावले
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शिरोडा राज्य मार्गावरील माजगाव दत्त मंदिर लगत रानगव्यांचा कळप अचानक रस्त्यावर आडवा येऊन रस्त्यावरून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या सहा असणे रिक्षाला धडक बसल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात रिक्षाच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले तर एक काच तुटून रिक्षात पडली. त्यावेळी रिक्षातील प्रवासी तसेच चालक किरकोळ जखमी झाले. रिक्षा गटारात कलंडली मात्र सुदैवाने ती तिथेच थांबल्याने मोठा अनर्थ टळला.
अपघातानंतर सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती पंकज पेडणेकर यांच्यासह कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रिक्षाचालक लवू सदाशिव पेडणेकर ( रा. तळवडे ) यांची त्यांनी विचारपूस केली. त्यानंतर वन विभागाला संपर्क करीत अपघाताची माहिती दिली.
त्यानंतर माजगांव वनपाल प्रमोद राणे तसेच मळगांव दक्षिण मोहन घोटुकडे तसेच पोलिस हवालदार मंगेश शिंगाडे, दीपक शिंदे, कॉ. सावळ आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी रिक्षाचे झालेले नुकसान भरपाई वनविभागाकडून मिळावी अशी मागणी रिक्षा चालकासह उपस्थित ग्रामस्थांनी लावून धरली. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधण्यात आला. नुकसान भरपाई न मिळाल्यास रास्ता रोको करू असा इशारा यावेळी स्थानिकांनी दिला.
या परिसरात गव्यांचा वावर नेहमीच असतो याआधी देखील या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत अनेक जण जखमी तसेच जायबंदी देखील झाले आहेत त्यामुळे वनविभागाने या गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरत आहे.














