सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा जागेचा प्रश्न अखेर निकाली

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात राजघराण्यात तडजोड

आमदार दीपक केसरकर यांची माहिती

​सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीतील बहुप्रतिक्षित मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न अखेर पूर्णपणे निकाली निघाला असून, यामुळे रुग्णालयाच्या उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात यासंदर्भात राजघराण्याच्या दोन्ही सदस्यांमध्ये यशस्वी तडजोड झाली आहे. हा गुंतागुंतीचा प्रश्न मार्गी लागण्याचे खरे श्रेय न्यायालयालाच दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे.
​आमदार केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वसामान्य लोकांचे हित लक्षात घेऊन न्यायालयाने तातडीने ५१ गुंठे जागा चार आठवड्यांच्या आत राजघराण्याला हस्तांतरित करण्याचे आणि उर्वरित उरलेल्या जागेवर शासनाने रुग्णालय उभारण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यासंदर्भातील न्यायालयाची अधिकृत ऑर्डर गुरुवारी संध्याकाळपर्यंत हातात येणार असून, यामुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामाला गती मिळणार आहे. या कायदेशीर प्रक्रियेत ॲडव्होकेट शिरीष हिरे यांचे विशेष आभार मानताना आमदार केसरकर यांनी सांगितले की, या केससाठी ॲड. हिरे हे मुद्दाम आले होते. जेव्हा त्यांना या संपूर्ण प्रश्नाचे गांभीर्य समजले आणि त्यांच्याशी फोनवर संवाद झाला, तेव्हा त्यांनी स्वतः येथे येऊन जागेची पाहणी केली व अत्यंत प्रभावीपणे न्यायालयात बाजू मांडली.

​यासोबतच राजघराण्याच्या दोन्ही सदस्यांनी देखील आपापली प्रतिज्ञापत्रे वेळेवर सादर करून सहकार्य केले. सावंतवाडीचे राजेसाहेब खेमसावंत, युवराज तसेच श्री व सौ. भोगले घराण्याचे या कार्यात चांगले सहकार्य लाभले. हा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष मेहनत घेणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचेही आमदार केसरकर यांनी विशेष धन्यवाद मानले आहेत.

​वास्तविक पाहाता हा निर्णय चार वर्षांपूर्वीच होऊ शकला असता, परंतु त्यावेळी दोघांचे एकत्रच प्रतिज्ञापत्र असावे असा न्यायालयाचा आग्रह असल्यामुळे ते शक्य झाले नव्हते. आता न्यायालयाने स्वतंत्र प्रतिज्ञापत्रे सादर करण्यास मान्यता दिली आणि हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला, याबद्दल आपण न्यायालयाचे पूर्णपणे ऋणी असल्याचे आमदार केसरकर म्हणाले. विशेषतः सावंतवाडी आणि परिसरातून वर्षाला तब्बल १० हजार रुग्णांना उपचारासाठी गोव्याला न्यावे लागत असल्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने जाणारे लोकांचे जीव, या सर्व गंभीर परिस्थितीचा न्यायालयाने सहानुभूतीपूर्वक विचार करून अत्यंत तातडीने हा निर्णय दिला आहे.

​आता जागेचा तिढा पूर्णपणे सुटल्यामुळे येत्या पुढील तीन महिन्यांमध्ये या रुग्णालयाच्या प्रत्यक्ष बांधकामाच्या कामाला सुरुवात होणे अपेक्षित आहे. यापूर्वी या प्रकल्पासाठी ३८ कोटी रुपये मंजूर करून आणण्यात आले होते आणि त्याचे टेंडरदेखील निघाले होते. मात्र, आताच्या बदललेल्या नवीन दरानुसार (दरसूचीनुसार) या रुग्णालयाचा ८० कोटी रुपयांचा नवीन सुधारित प्लॅन तयार करण्यात आलेला असून, तो लवकरच मंजुरीसाठी शासनाकडे सादर केला जाईल.
प्रस्तावित रुग्णालयाची इमारत सात मजली असणार असून त्यात सुमारे १०० बेडची क्षमता असेल. या रुग्णालयामध्ये कॅन्सर, ब्रेन कॅन्सर, हार्ट (हृदयरोग) आणि युरोलॉजी यांसारख्या गंभीर आजारांवर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असणार आहेत.

​दरम्यान, इको-सेंसिटिव्ह झोनच्या मुद्द्यावर बोलताना आमदार केसरकर म्हणाले की, इको-सेंसिटिव्ह झोनमधून सावंतवाडी शहराला वगळण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाने आपापल्या हरकती नोंदवणे अत्यंत गरजेचे आहे. जर शहराला इको-सेंसिटिव्ह झोन लागू झाला, तर सावंतवाडीचा संपूर्ण विकास निश्चितच थांबेल. यापूर्वीसुद्धा अशा हरकती नोंदवण्यात आल्या होत्या, परंतु आता पुन्हा एकदा सर्व नागरिकांनी यामध्ये सक्रिय सहभागी होऊन आपापल्या हरकती नोंदवणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.