देवरूखमधील सोने व्यापाऱ्याच्या लूट-अपहरण प्रकरणातील पिस्तुल लांजातील मुचकुंदी नदीत सापडले

निलेश जाधव / देवरूख :

संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील सोने व्यापार्‍याच्या अपहरण-लूट प्रकरणातील मुख्य संशयित सागर कदम याच्या अटकेनंतर त्याच्या चौकशीअंती या प्रकरणात संशयित आरोपींनी वापरलेले पिस्तुल देवरूख पोलीसांनी लांजा तालुक्यातील वाटूळ येथील मुचकुंदी नदीतून शनिवारी जप्त केले आहे. त्यामुळे या प्रकरणात सोने व्यापाऱ्याला आरोपींनी ज्याद्वारे धाक दाखवला ते पिस्तुलच मिळाल्याने तपासात महत्त्वपूर्ण उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देवरूख येथे राहणारे सुवर्णकार धनंजय केतकर यांचे काही दिवसांपूर्वी अपहरण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते. या प्रकरणात काही आरोपींना आधीच अटक झाली असली तरी, तपासात सागर कदम (रा. हातखंबा) हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यासाठी पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर गुरुवारी त्याने देवरूख पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला तब्बल नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सागरची पोलीसांनी चौकशी केली असता त्याने सहकाऱ्यांनी या प्रकरणात वापरलेले पिस्तूल आपण लांजा तालुक्यातील वाटूळ येथील मुचकुंदी नदीत फेकून दिल्याचे पोलीसांना सांगितले. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, हे. काँ. प्रशांत मसुरकर, हे. काँ. सचिन पवार, हे. काँ. सचिन कामेरकर, पो. काँ. सुहास लाड यांनी शनिवारी घटनास्थळी जावून पाणबुड्यांमार्फत नदीतील पाण्यात पिस्तुलचा शोध घेण्यात आला. यावेळी हे पिस्तूल सापडले. आता हे पिस्तूल पोलीसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणातील आणखी काही उलगडा होण्यास मदत होणार आहे.