चिपळूणात शिवसेना-भाजप युती; महाविकास आघाडीत बिघाडी

नगराध्यक्ष पदासाठी सप्तरंगी लढत!

चिपळूण (संतोष सावर्डेकर):
चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुतीमधील शिवसेना-भाजप युती तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्षाला बाजूला ठेवले असल्याचे समोर आले आहे. तर महाविकास आघाडीत देखील बिघाडी झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी सप्तरंगी लढत होणार आहे. तर एकंदरीत शिवसेना-भाजप युती तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष, काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे पक्ष आमने-सामने आल्याने ही निवडणूक रंगतदार होणार आहे.

चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी होण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले. मात्र, सुरुवातीपासून शेवटपर्यंत महायुती एकत्र आलीच नाही. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतून काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना उबाठाने स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने महाविकास आघाडी फुटली आहे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देखील स्वतंत्रपणे रिंगणात उतरावे लागले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे.

शिवसेना- भाजप युतीने नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे चिपळूण शहर प्रमुख उमेश सपकाळ यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. तर या दोन पक्षांनी जागा वाटपात सामांजस्यपणा दाखवत शिवसेनेने नगराध्यक्ष पदासह १६ उमेदवार तर भाजपने ११ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली आणि काहींनी आपले पदांचे राजीनामे दिले. यामध्ये माजी नगरसेवक परिमल भोसले व श्रीराम शिंदे यां दोघांनी अपक्ष उमेदवारीच्या माध्यमातून भाजपचे शहराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार शशिकांत मोदी यांच्या विरोधात प्रभाग क्रमांक ९ मध्ये शड्डू ठोकला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्षाने महायुती व्हावी, यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. या अनुषंगाने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलिंद कापडी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तरी महायुती होऊ शकली नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरली असून नगरसेवक पदासाठी १५ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

काँग्रेसमध्ये नगराध्यक्ष पदावरून राजकीय नाट्यमय घडामोडी!

काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदावरून मोठ्या राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी लियाकत शाह यांनी अर्ज भरला होता. मात्र, त्यांचा एक अर्ज अवैध ठरला. त्यांनी अपक्ष भरलेला अर्ज ग्राह्य झाला. मात्र, त्याआधी शिंदे सेनेकडून काँग्रेसमध्ये आलेले सुधीर शिंदे यांनी नगरसेवक पदासह नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी त्यांचा अर्ज वैध ठरला. जर सुधीर शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असता तर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार लियाकत शाह झाले असते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने काँग्रेस तालुकाध्यक्ष शहा यांच्यावर अपक्ष निवडणूक लढवण्याची नामुष्की आली आहे. या राजकीय नाट्यानंतर लियाकत शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगत काँग्रेसमधील काहींवर आरोप केले आणि आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. काँग्रेसचे नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

महाविकास आघाडीत बिघाडी

तर दुसरीकडे शिवसेना उबाठा पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने देखील प्रत्येकी एक-एक नगराध्यक्ष पदासह १५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. मात्र, शिवसेना उबाठा पक्षातील एका नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेश कदम यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे शिवसेना उबाठामध्ये देखील आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे. तर एकंदरीत महाविकास आघाडीत बिघाडी झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.