लळित व दशावतार ही मूळ विधीनाट्ये” — डॉ. बाळकृष्ण लळीत

“लळित आणि दशावतार ही मूलतः विधीनाट्ये असून मध्ययुगापासून ग्रामीण समाजाच्या प्रबोधनाचे प्रभावी माध्यम राहिली आहेत. या कलांमधून नीतिमत्ता, धार्मिक बोध आणि वैदिक ज्ञान सामान्य लोकांपर्यंत सहज पोहोचवले गेले,” असे प्रतिपादन डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी केले.

इंदूर येथील महाराष्ट्र साहित्य सभेने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्रातील लोककला’ या विशेष व्याख्यानात ते बोलत होते. व्याख्यानाच्या प्रारंभी अध्यक्ष अश्विन खरे यांच्या हस्ते डॉ. लळीत यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सचिव प्रफुल्ल कस्तुरे, मृगैन गदेवाडीकर, मिलिंद देशपांडे, माधव लळीत आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या सविस्तर विवेचनात डॉ. लळीत म्हणाले की, लळित ही कीर्तनपरंपरेतील विधीशी जोडलेली कला आहे. देवतेच्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी लळितांचे कीर्तन झाल्यानंतर देव-देवतांची व लौकिक व्यक्तिरेखांची सोंगे रंगमंचावर येतात. सूत्रधार व गावभाट-राजभाट यांच्या माध्यमातून संवादरूप वेदान्ताचा उपदेश सादर होतो. त्यामुळे कीर्तनातील उपदेश अधिक साध्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचतो. कार्यक्रमानंतर प्रसाद वाटप करून लळिताची सांगता होते.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, दासोपंत यांनी लळितांचे अभंग व पदे रचली, तर संत एकनाथांनी भारूडातून सोंगपरंपरा दृढ केली, अशी माहिती त्यांनी दिली. समाजातील चुकीच्या प्रवृत्तीवर प्रहार करणे आणि नैतिकतेचा संदेश देणे हे लळितांचे वैशिष्ट्य असल्याचेही त्यांनी सांगितले. “झाला त्रिभुवनी उल्हास — लळित गाये भानुदास”, “गळित झाली काया — गातो लळित पंढरीराया” यांसारख्या अभंगांचा उल्लेख त्यांनी केला.

दशावतार परंपरेविषयी सांगताना डॉ. लळीत म्हणाले की, दशावतारही मूलतः मंदिरातील विधीनाट्य परंपरेतूनच विकसित झाला आहे. आडदशावतार व आख्याननाट्यानंतर सकाळी ‘काला’ हा विधी पार पडतो. दहीहंडी फोडताना विष्णू किंवा कृष्णाचे सोंग धारण केले जाते. प्रसाद ग्रहण केल्यानंतर ‘दहिकाला’ची सांगता होते.

काळानुरूप लळित व दशावताराने लोकनाट्याचे रूप धारण केले असले तरी भक्ती, लीलादर्शन, प्रबोधन आणि करमणूक हे त्यांचे मूलभूत उद्देश आजही समान ताकदीने जिवंत असल्याचे डॉ. लळीत यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मनीष खरगोणकर यांनी केले.