वेंगुर्ले ; प्रतिनिधी
वेंगुर्ले येथील श्री देवी सातेरी मंदिरात सुरू असलेल्या शतचंडी महायाग अनुष्ठानप्रसंगी आयोजित केलेल्या सामुहिक कुंकूमार्चनला महिला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी बहुसंख्य महिलांनी उपस्थित राहून कुंकूमार्चन केले.
वेंगुर्ला गावची ग्रामदेवी श्री देवी सातेरीच्या मळलेपन विधी पार पडल्यानंतर मंदिरात गुरूवारपासून शतचंडी महायाग अनुष्ठान करण्यात आले. या अनुष्ठानप्रसंगी देवता स्थापना, आवाहन, सप्तशती पाठवाचन यासोबतच शुक्रवारी महिलांसाठी सामुहिक कुंकूमार्चन आयोजित केले होते. बहुसंख्य महिला भाविकांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहत कुंकूमार्चन सेवा केली.
दरम्यान, शनिवारी या शतचंडी महायाग अनुष्ठानाची पूर्णाहूती होणार आहे. तर रविवारी सकाळी श्री सत्यनारायण महापूजा, बारापाच देवतांना नैवेद्य, महाआरती, त्यानंतर महाप्रसाद तसेच रात्री 10 वा. सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ, कसई-दोडामार्ग यांचे नाटक होणार आहे. भाविकांनी महाप्रसादाचा आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.











