देवगड कोस्टल हाफ मॅरेथॉन हा आरोग्यासाठी महत्त्वाचा उपक्रम — नामदार नितेश राणे

देवगड कोस्टल हाफ मॅरेथॉन उत्साहात संपन्न; स्थानिकांबरोबरच बाहेरील धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले.

देवगड प्रतिनिधी :
देवगड कोस्टल हाफ मॅरेथॉन हा स्तुत्य उपक्रम आहे. आरोग्यासाठी आणि फिट राहण्यासाठी असे उपक्रम घेणे गरजेचे आहे. देवगड हे चांगले उपक्रम आयोजित करण्यासाठी ओळखले जाते. या उपक्रमासाठी विविध ठिकाणांहून स्पर्धक देवगडमध्ये उपस्थित होते. असे उपक्रम घेणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे, असे मत मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.

देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी आणि डॉक्टर फॅटर्निटी क्लब, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “देवगड कोस्टल हाफ मॅरेथॉन रन 2025” हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. “दौड आरोग्याची, साद देवगडच्या पर्यटनाची” या घोषवाक्याखाली झालेल्या या मॅरेथॉनमध्ये विविध अंतराच्या स्पर्धांना धावपटूंचा मोठा प्रतिसाद मिळाला. देवगडच्या निसर्गरम्य किनारपट्टीवरून धावण्याचा अद्वितीय अनुभव सहभागींना मिळाला. स्पर्धेचे उद्घाटन डायमंड हॉटेल येथून करण्यात आले. 21, 11 आणि 5 किलोमीटर गटात पुरुष व महिला धावपटूंनी दमदार कामगिरी केली. महाराष्ट्राचे बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

यावेळी देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीचे अध्यक्ष गौरव पारकर, खजिनदार दयानंद पाटील, एकनाथ तेली, प्रविण पोकळे, मनस्वी घारे, विजय बांदिवडेकर, अनिकेत बांदिवडेकर, अनिल गांधी, माजी आमदार अजित गोगटे, बाळा खडपे, संदीप साटम, राजा भुजबळ, योगेश चांदोस्कर, प्रियांका साळसकर, तन्वी चांदोस्कर आदी उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये विजेते :
21 किमी पुरुष गट — प्रथम : ओमकार बयकर, द्वितीय : संकेत माचणे, तृतीय : ओम उन्हाळकर.
21 किमी महिला गट — प्रथम : रेश्मा पांढरे, द्वितीय : चंद्रकला सातपुते, तृतीय : अॅड. सोनल पालव.
11 किमी पुरुष गट — प्रथम : यश शिर्के, द्वितीय : रितेश देवळेकर, तृतीय : लोचन पाटील.
11 किमी महिला गट — प्रथम : मेघा सातपुते, द्वितीय : स्वाती व्हानवडे, तृतीय : श्रेया अटक.

स्पर्धेनंतर विजेत्यांना ट्रॉफी, मेडल, ऑनलाईन प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. स्पर्धेदरम्यान पोलिस प्रशासन, स्वयंसेवक, वैद्यकीय टीम आणि आयोजकांनी उत्कृष्ट व्यवस्था केली. धावपटूंनी अशा उपक्रमांमुळे आरोग्याचे महत्त्व पटते तसेच देवगड किनारपट्टीतील पर्यटनालाही चालना मिळते, अशी प्रतिक्रिया दिली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व आयोजक व सहकार्यकर्त्यांचे धावपटूंनी मनःपूर्वक अभिनंदन केले.