काँग्रेसमध्ये शह-काटशह; शिवसेना उबाठात दुफळी!

सिकंदर कोण होणार?याकडे सर्वांचे लक्ष!

चिपळूण :– चिपळूण नगर परिषदेसाठी चांगलीच रणधुमाळी गाजत असून महायुती की महाविकास आघाडी या संदर्भात चर्चांना पेव फुटले असतांना शिवसेना-भाजप युती झाल्याचे समोर आले तर महाविकास आघाडी पुरती दुभंगली आहे. त्यातच शिवसेना उबाठामध्ये देखील दुफळी माजली आहे. काँग्रेसमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. एकंदरीत चिपळूण नगर परिषदेची दिवसेंदिवस रंगतदार बनत जाणार आहे. या सर्व घडामोडी कोण ‘सिकंदर’ होणार ?याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एका जागेच्या नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नगरसेवक पदाच्या २८ जागांसाठी १२९ उमेदवार आपले नशीब अजमवणार आहेत. महाराष्ट्रातील सत्तेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरपरिषद नगरपंचायत निवडणूकीमध्ये महायुती, महाविकास आघाडी होईल, अशी अटकळ कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र, कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला असल्याचे सध्याचे राजकीय परिस्थितीवरून लक्षात येत आहे.

शिवसेना-भाजप युती तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरला आहे. मात्र, या पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवाराने नगराध्यक्ष पदाचे उमेदवारीचा अर्ज मागे घेतला. तर दुसरीकडे महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी आमदार रमेश कदम यांनी सुरुवातीपासूनच आपण नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांनी देखील आपण नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात येणार असल्याचे जाहीर करून टाकले. तरीही महाविकास आघाडी व्हावी, या दृष्टीने चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. मात्र, यात यश आले नाही. तर दुसरीकडे शिवसेना- उबाठा एकत्र येण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेश कदम यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शिवसेना उबाठा पक्षातील नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. यामुळे शिवसेना उबाठा एकत्र येतील, अशी अटकळ बांधली गेली.

परंतु, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवस अगोदर शिवसेना उबाठा पक्षातील माजी नगरसेवक राजू देवळेकर यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला. आदेश आले असल्याने आम्ही अर्ज दाखल करीत असल्याचे शिवसेना उबाठा पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ही परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उबाठा यांच्यात फारकत झाल्याचे समोर आले. मात्र, शनिवारी शिवसेना उभाठा पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या पक्षातील उमेदवाराने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे आजच समजले, असे पत्रकार परिषदेत सांगितल्याने शिवसेना उबाठा पक्षात समन्वयाचा अभाव असल्याचे समोर आले. तर आपण एकदा शब्द दिला की तो पाळतो, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे रमेश कदम हेच आमच्या आघाडीचे उमेदवार आहेत, असा खळबळजनक दावा करीत कदम यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर करत खळबळ उडवून दिली आहे. एकंदरीत सेनेतली अंतर्गत गटबाजी अक्षरश: चव्हाट्यावर आली असल्याने पक्षांतर्गत संघर्षाची चिन्हे आता स्पष्टपणे दिसू लागली आहेत. शिवसेना उबाठा पक्षातील राजकीय खेळीमध्ये शिवसेना उबाठा गटात सध्यातरी पक्षाचे नेते आ. भास्कर जाधव व माजी खासदार विनायक राऊत असे दोन गट पडले असल्याची राजकीय वर्तुळात जोरदारपणे चर्चा सुरू आहे.

याचबरोबर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षामध्ये देखील दुफळी माजली असल्याचे समोर येत आहे. काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार असलेले लियाकत शाह यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने शिवसेना शिंदे गटातून काँग्रेसमध्ये आलेले सुधीर शिंदे यांना एक प्रकारे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची लॉटरी लागली आहे. यानंतर नाराज झालेल्या शाह यांनी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देत जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग, रमेश कीर, सुरेश कातकर यांच्यावर टीकेची झोड उठवली. यावर प्रतिउत्तर म्हणून सोनललक्ष्मी घाग यांनी शहा यांच्या राजकीय हालचाली संशयास्पद वाटल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेस पक्षाच्या हिताच्या दृष्टीने आपण निर्णय घेतले असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तर दुसरीकडे शाह यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या दुसऱ्या गटाने कोअर कमिटीची स्थापना करीत या कोअर कमिटीच्या बैठकीला काँग्रेसचे काँग्रेसच्या नगरसेवक पदाचे उमेदवार देखील उपस्थित होते. एकंदरीत या घडामोडी पाहता चिपळुणात काँग्रेसचा निवडणुकीसाठी दुसरा गट सक्रिय झाला असल्याचे समोर आले आहे. या राजकीय घडामोडी पाहता काँग्रेसमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे, एवढे नक्की!