चिपळूणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मांडली स्पष्ट भूमिका
रो-रो बोट सेवा नियमित सुरू राहणार; देवगडमध्ये मत्स्य महाविद्यालयासाठी मंगळवारी मुंबईत बैठक
चिपळूण (प्रतिनिधी):– रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळमधून पालकमंत्री ना. उदय सामंत व आ. किरण सामंत, आ. शेखर निकम यांना प्रत्येकी २० कोटींचा निधी तर खासदार नारायण राणे यांना फक्त ५ कोटींचा निधी विकासकामांसाठी दिला आहे, तेव्हा माजी आ. डॉ. विनय नातू निधी वाटपाबाबत जे काही बोलत आहेत, त्यात तथ्य आहे, यावरून निधी वाटपात तफावत असल्याचे राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी चिपळूण येथील वाशिष्ठी डेअरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. शिवाय रो – रो बोट सेवा ही फक्त गणेशोत्सवासाठी नसून ती नियमित सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करताना देवगड येथील रखडलेले मत्स्य महाविद्यालय पूर्णत्वास जाण्यासाठी मंगळवारी मुंबई बैठक होणार असल्याची माहिती ना. राणे यांनी यावेळी दिली.
यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, उद्योजक प्रशांत यादव, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा चव्हाण, माजी नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. स्वबळावर लढलो तरच आपली ताकद दिसून येईल, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तेव्हा आपण कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवू, असे ना. नितेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. तर आपण आपली ताकद किती वेळ झाकून ठेवायची? असा सवाल देखील राणे यांनी यावेळी उपस्थित केला.
भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष वाढवत असताना गावातील ग्रामस्थ भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे विकासात्मक कामांची निवेदने देत आहेत. मात्र, जिल्हा नियोजन मधून तितकासा निधी मिळत नसल्याने कार्यकर्त्यांसमोर पक्ष वाढीचे आव्हान आहे. पालकमंत्री ना. उदय सामंत, आ. किरण सामंत, आ. शेखर निकम यांना प्रत्येकी २० कोटी तर खासदार नारायण राणे यांना केवळ ५ कोटींचा निधी विकासात्मक कामांसाठी मिळत आहे. हे थांबणार कधी असा सवाल ना. राणे यांनी यावेळी उपस्थित केला.
रो- रो बोट केवळ गणेशोत्सवासाठी नाही तर नियमित सुरू राहील, अशी ग्वाही दिली. गणेशोत्सव काळात दोन मोदी एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे. ही एक्सप्रेस रत्नागिरीत देखील थांबणार आहे. तरी गणेश भक्तांनी बुकिंगसाठी भाजपच्या जिल्हाध्यक्ष व मंडळ अध्यक्षांकडे दिनांक १७ व १८ ऑगस्ट रोजी संपर्क साधावा, असे आवाहन केले. तसेच देवगड येथील रखडलेले मत्स्य महाविद्यालय सुरू होण्यासाठी मंगळवारी मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती ना. राणे यांनी यावेळी दिली
मुंबई- गोवा महामार्गाचे काम समाधानकारक होत नसले तरी आमचे बारीक लक्ष आहे. पुढच्या वर्षी हा मार्ग पूर्ण होईल, असा विश्वास पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत त्यांचे खासदार जेव्हा निवडून आले तेव्हा आलबेल होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते ओरड करीत आहेत. मनाप्रमाणे झाले नाही की लोकशाही धोक्यात, असे बोलणे म्हणजे उद्धव ठाकरेंचे हे बोलणे शेंबड्या पोराप्रमाणे आहे, असा टोला ना. नितेश राणे यांनी पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना हाणला. मुंबईचा महापौर भगवाधारी महापौर महायुतीचा बसणार! भास्कर जाधव यांची जी सध्या भूमिका सुरू आहे. ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे का? ते उद्धव ठाकरे यांनी एकदा जाहीर करावं, असे आव्हानच ना. नितेश राणे यांनी यावेळी दिले.
यावेळी भाजपा चिपळूण शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, गुहागर माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, खेड दक्षिण मंडळ अध्यक्ष विनोद चाळके, गुहागर मंडळ अध्यक्ष अभय भाटकर, खेड उत्तर मंडळ अध्यक्ष ऋषिकेश मोरे, चिपळूण ग्रामीण पश्चिम मंडल अध्यक्ष उदय घाग, दापोली ग्रामीण मंडळ अध्यक्ष सचिन होडबे, दापोली शहर अध्यक्ष सौ. जया साळवी, मंडणगड अध्यक्ष प्रवीण कदम, सौ. स्मिता जावकर, चिपळूण माजी तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, माजी नगरसेवक आशिष खातू, श्रीराम शिंदे, संदीप भिसे, शुभम पिसे आदी उपस्थित होते.











