राजापुरात नगरसेवक पदासाठीही होणार रंगतदार लढती

राजापूर अर्बन बँकेच्या विद्यमान अध्यक्षांसह दोन संचालक आजमवत आहेत आपले भवितव्य
माजी अध्यक्ष हनिफ मुसा काझी यांची कन्या व वहिनीही निवडणूकीच्या रिंगणात

शहरवासीयांसह राजकिय निरीक्षकांचे या लढतींकडे लक्ष

राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचारात आता हळू हळू रंगत येऊ लागली आहे. मात्र या निवडणूकीत अनेक दिग्गज आपले भवितव्य आजमावत असल्याचे पहावयास मिळत आहे. राजापूर अर्बन बँकेचे विद्यमान अध्यक्ष संजय ओगले व माजी अध्यक्षा व विद्यमान संचालिका अनामिका जाधव, संचालक किशोर जाधव या नगर परिषद निवडणूकीत नगरसेवक पदासाठी वेगवेगळया प्रभागात आणि वेगवेगळया पक्षातुन निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे त्यांच्या लढतीकडेही शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

तर राजापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष हनिक मुसा काझी यांची कन्या साजिया काझी व त्यांच्या छोटया भावाची पत्नी भावजय सुमैया काझी या देखील शिवसेनेकडून वेगवेगळया प्रभागात प्रथमच निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्या लढतीकडेही शहर वासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

राजापूर नगर परिषदेची निवडणूक कायमच रंगतदार झालेली आहे. यापुर्वी झालेल्या अनेक निवडणूकांमध्ये काहींना पराभवाचा धक्का तर काहींना अनपेक्षितपणे विजयाची लॉटरी लागलेली आहे. अगदी एक या दोन मतांनीही जय पराजय झालेला आहे. त्यामुळे राजापूर नगर परिषदेच्या निकालाकडे शहरवासीयांचेच नाही तर जिल्हावासीयांचे लक्ष लागून रहाते.

राजापूर अर्बन बँकेचे विद्यमान अध्यक्ष संजय ओगले आपल्या पारंपारीक प्रभागातुन निवडणूक लढवत आहेत. यापुर्वी दोन वेळा नगरसेवक राहिलेले ओगले हे तिसऱ्यांदा नगरसेवक पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात आहेत. एक संयमी व मितभाषी नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाक क्रमांक नऊ ब मधून ते शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उबाठाचे सुबोध पवार व अपक्ष म्हणून संजय गणपत ओगले निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे. संजय ओगले हॅट्रीक करणार का याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

राजापूर अर्बन बँकेच्या माजी अध्यक्ष व विद्यमान संचालिका अनामिका जाधव या देखील प्रभाग क्रमांक आठ अ मधून निवडणूकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्या असलेल्या सौ. जाधव या या प्रभागातुन उबाठाच्या तिकिटावर आघाडीतुन निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीचे शिवसेनेच्या प्रेरणा नार्वेकर तर अपक्ष म्हणून तनिष्का डंबे या निवडणूकी लढवत आहेत. या दोन्ही उमेदवार प्रथमच निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तर सौ. जाधव यांनी यापुर्वींच्या प्रभाग क्रमांक दोन मधून निवडणूक लढविली होती. त्यामुळे या लढतीकडेही शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

राजापूर अर्बन बँकेचे संचालक किशोर जाधवही महायुतीकडून शिवसेना पक्षाचे उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक पाच अ मधून निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी त्यांचा सामना महाविकास आघाडीचे सिध्दांत नाना जाधव यांच्याशी होणार आहे. या दुरंगी सामन्यात कोण बाजी मारणार याबाबतही कमालीची उत्सुकता आहे.

राजापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष यांचे प्रभाग आरक्षित झाल्याने ते निवडणूक रिंगणाबाहेर आहेत. मात्र आंम्ही चालवू हा पुढे वारसा म्हणत त्यांच्या कन्या साजिया हनिफ काझी या प्रभाग क्रमांक दहा ब मधून महायुतीकडून शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणात आहेत. साजिया काझी प्रथम निवडणूकीच्या रिंगणात उतरत असल्या तरी निवडणूकीच्या रणनितीचे व डावपेचाचे चांगलेच धडे त्यांनी आपल्या वडिलांकडून घेतलेले आहेत. काझी यांच्या अनेक निवडणूकीत पडद्यामागे मॅनेजमेंट करण्यात साजिया यांचा सहभाग होता. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उबाठा च्या नसिमा याहू या निवडणूकीच्या रिंगणात आहेत. या दुरंगी सामन्यात मतदार कोणाला कौल देतात याकडेही राजकिय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

हनिफ काझी यांचे छोटे बंधू जिलानी काझी यांच्या पत्नी सुमैया काझी या प्रभाग क्रमांक पाच ब मधून महायुतीकडून शिवसेना पक्षाकडून उमोदवार असून त्या प्रथमच निवडणूकीला सामोऱ्या जात आहेत. या प्रभागात महाविकास आघाडीकडून शबाना निसार मुल्ला या निवडणूक लढवत आहेत. या दुरंगी सामन्यात काय होणार याकडेही शहर वासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

राजापुर नगर परिषदेच्या या विविध प्रभागात होणाऱ्या रंगदार आणि चुरशीच्या अशा लढतीत काय होणार आणि कोण बाजी मारणार याकडे शहर वासीयांच्या नजरा आहेत.

फोटो- संजय ओगले, सुबोध पवार, किशोर जाधव, सिध्दांत जाधव, अनामिका जाधव, प्रेरणा नार्वेकर, तनिष्का डंबे, साजिया काझी, सुमैया काझी, शबाना मुल्ला, नसिमा याहू