रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाच्या “संगमेश्वरी, कोकणी (मुस्लिम) बोलीभाषा आणि संस्कृती” या परिसंवादातील सूर
रत्नागिरी : प्रमाण भाषा, शुद्ध मराठी हे सगळे ठीक असले तरीही आपण जी बोली बोलतो त्यात कमीपणा काहीच नाही; मात्र हल्ली न्यूनगंडामुळे बोलीभाषा बोलण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे ती जवळजवळ संपली आहे. अलीकडे काही ठराविक पट्ट्यातच ती जपण्याचा प्रयत्न होतोय, तरुणही आपली बोली समाज माध्यमांमधून पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. बोलीचे संचित एका पिढी पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जायला पाहिजे. बोलीभाषा सजग होण्याची गरज आहे, असा सूर “संगमेश्वरी, कोकणी (मुस्लिम) बोलीभाषा आणि संस्कृती” या परिसंवादातून उमटला.
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (मुंबई) यांच्या अनुदानातून आणि नवनिर्माण शिक्षण संस्थेतर्फे रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन घेण्यात आले. यात दुपारच्या सत्रात आयोजित केलेल्या या परिसंवादात भाषा अभ्यासक अरुण इंगवले, संगमेश्वरी बोलीचे अभ्यासक आणि पत्रकार अमोल पालये, गोवा येथील बोलीभाषा अभ्यासक प्रा. सारिका अडविलकर सहभाग घेतला. या परिसंवादाचे अध्यक्षस्थान मराठी, बोलीभाषा अभ्यासक प्रा. डॉ. निधी पटवर्धन यांनी भूषविले.
अरुण इंगवले यांनी एकच शब्दाला बोलीभाषेत किती समानार्थी शब्द असू शकतात याची माहिती काही उदाहरणे देऊन दिली. कुणबी आणि संगमेश्वरी बोली वेगवेगळी नाही. काही शब्दांचे उच्चार थोडे वेगळे असल्याचे नमूद करतानाच त्यांनी पूर्वी ७० टक्के बोली बोलायची, आता मात्र तिचा अस्त होत असल्याची खंत व्यक्त केली. आज काही तरुण पुढे येत असून समाज माध्यमांचा वापर करत आपली बोली सर्वदूर पोचवत आहे. यामुळे आगरी, मालवणी आजही तग धरून आहे; मात्र यात आपली संगमेश्वरी बोली कुठेय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अलीकडे प्रभाकर मोरे, वैभव मांगले यांसारखे अभिनेतेही आपली बोली पुढे आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
अमोल पालये यांनी संगमेश्वरी बोलीचे महत्त्व विषद करताना जाखडी, नमन यांची उदाहरणे दिली. तर गोवा येथील प्रा. सारिका आडविलकर कोकणी (मुस्लिम) भाषेची माहिती दिली. किनारपट्टीवरील विशेषतः रत्नागिरीतील खाडीपट्ट्यात मुस्लिम, दालदी समाज कोकणी भाषा बोलत असून, ती खाली दक्षिणकडेही काही ठिकाणी बोलली जात असल्याचे सांगितले.
परिसंवादाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. निधी पटवर्धन यांनी भाषेची श्रीमंती असते आणि ती मुक्त पद्धतीने उधळता येते आजच्या पिढीला कळायला हवे, असे मत व्यक्त केले. त्यासाठी आपण माणसांची परिस्थितीशी तिथल्या संस्कृतीशी जोडले जाणे गरजेचे आहे. आभासी वावरण्यापेक्षा समाजात मिसळू आणि जाणून घेऊ तेव्हाच आपण अधिकाधिक संपन्न होऊ, असे त्या म्हणाल्या.
या परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ. शंकर जाधव यांनी केले. बदउज्जमा खावर सभागृहात झालेल्या या परिसंवादाला संमेलनाचे स्वागताध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांच्यासह विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









