देवरूख:
आजूबाजूच्या जिल्ह्यात काय झालंय त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. तुमचे लक्ष फक्त देवरूखमधील महायुती आणि देवरुख शहराचा सर्वांगीण विकास हेच असले पाहिजे. सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू ठेवून विकासकामांचे नियोजन करा, निधी देण्याची जबाबदारी माझ्यावर सोडा. देवरुखच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा ठाम विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी देवरुखवासीयांना दिला. देवरूख नगरपंचायत निवडणुकीत महायुती प्रचंड मोठे यश प्राप्त करेल असेही ते यावेळी म्हणाले. मंगळवारी देवरूख येथील महायुतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
देवरुख नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचारसभेचे शहरातील नृसिंह मंगल कार्यालय सभागृहात मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. या प्रचारसभेसाठी पालकमंत्री उदय सामंत मंगळवारी देवरूखात आले होते. यावेळी ते म्हणाले कि, जिल्ह्यात सर्वात भक्कम महायुती देवरुखमध्ये झाली असून मला त्याचा सार्थ अभिमान आहे. महायुतीच्या माध्यमातून निवडणुकांना सामोरे जाताना आपण फक्त आणि फक्त विकासाचे व्हिजन समोर ठेवले पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक असणारा,त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणारा विकास झाला पाहिजे, मतदारांकडे जाताना आपण त्यांच्यासाठी काय करणार आहोत हे ठामपणे सांगा, या जिल्ह्याचा कुटुंबप्रमुख म्हणून आपल्याला आज शब्द देतो, मृणालताई शेट्ये नगराध्यक्ष झाल्यानंतर ज्या-ज्या कामासाठी निधी मागतील त्या सर्व कामांना निधी देण्याची जबाबदारी मी घेतो. विकासासाठी अजिबात निधी कमी पडणार नाही, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
देवरूखात महायुती जिंकणारच आहे. परंतु जिंकणार आहे म्हणून गाफील राहू नका, प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत पोहचा, आपले विचार, विकासाची संकल्पना त्यांना समजवून सांगा, त्यांना विश्वासात घ्या आणि विश्वास द्या की पुढील पाच वर्षात या देवरुखचा कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पालकमंत्री म्हणून मी सदैव आपल्या बरोबर आहे. सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये काय चाललंय याकडे अजिबात लक्ष देऊ नका, तेथील नेते त्यासाठी सक्षम आहेत. तुम्ही फक्त देवरुखकडे लक्ष द्या, असे मार्गदर्शन करत ना. उदय सामंत यांनी अहोरात्र मेहनत करण्याच्या सूचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केल्या. सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा आपल्याकडून आहेत. आपले काम पारदर्शक असले पाहिजे.
जनतेशी आपण बांधील आहोत. त्यांना समाधान वाटेल असे काम आपल्याला करायचे आहे. आपल्याकडे जनतेच्या मनातील विकासकामे असली पाहिजेत. खोटं बोलणाऱ्यांवर अजिबात विश्वास ठेवू नका, असेही शेवटी त्यांनी नमूद केले. यावेळी माजी आमदार सुभाष बने, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, विलास चाळके, भाजपचे निवडणूक प्रभारी प्रमोद अढटराव, भाजपचे तालुकाध्यक्ष रुपेश कदम, जेष्ठ नेते मुकुंद जोशी, शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, बाळू ढवळे, शहराध्यक्ष हनिफ हरचिरकर, शिवसेनेचे सचिन मांगले, प्रसाद सावंत, देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, रिपाईचे चंद्रकांत जाधव, कृष्णा कदम, जनार्दन कांबळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपचे शहराध्यक्ष सुशांत मुळ्ये यांनी केले.
चौकट
आमदर शेखर निकमांवर प्रश्नचिन्ह नको
आमदार शेखर निकम हे या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत म्हणालेकि, आम.शेखर सर मुंबईत आहेत. त्यामुळे ते आले नाहीत. त्यांनी फोन करून मला सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह नको. पत्रकारांना अधिक विश्लेषण हवे असेल तर माझ्याकडे संपर्क साधा, उगाच कोणताही संभ्रम निर्माण होता कामा नये, आम.शेखर सर आमच्या बरोबर होते आणि आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील कोणताही संभ्रम न बाळगता काम करावे, असे स्पष्टपणे उदय सामंत म्हणाले.












