स्थानिक उमेदवारही न मिळालेल्या विरोधकांची बिकट अवस्था;

खेडमध्ये महायुतीचा स्वच्छ वारेमाप विजय निश्चित — गृहराज्यमंत्री योगेश कदम”

खेड :
खेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार करताना सांगितले की, “विरोधी पक्षाकडे स्थानिक नेतृत्व नाही. पतपेढी चालवणाऱ्यांनी ज्यांना कर्ज दिले, त्यांनाच उमेदवार केले आहे. अशी उमेदवारी बांधिलकीची, विकासाची नव्हे.”
ते पुढे म्हणाले की सुज्ञ मतदार मतदानाच्या आधीच निर्णय घेतात आणि आता खेडमधील जनतेने आपला निर्णय निश्चित केला आहे. “तीन तारखेला निकाल लागेल तेव्हा महायुतीचे 20 नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येतील, विरोधकांचा अस्तित्वही दिसणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गृहराज्यमंत्री कदम म्हणाले, “सहा महिन्यांपूर्वी कुणाला वाटले नसते की मी, संजय कदम आणि वैभव खेडेकर हे तिघे एकत्र एका व्यासपीठावर उभे राहू. पण आज ही शक्ती एकत्र आल्यामुळे खेडमधील राजकीय संघर्ष संपला आहे. तिघांकडे असलेली ऊर्जा वेगवेगळ्या दिशांना वाया जात होती. आता तीच ताकद एकाच दिशेने काम करणार आहे आणि खेडचा विकास चारपट गतीने होणार आहे.”
एकेकाळी खेडमध्ये शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली 17 नगरसेवक निवडून येत असत. आता पुन्हा 20 वर्षांनंतर तसाच जनतेचा उत्साह दिसत असून महायुतीच्या विजयाची खात्री वाढली आहे. प्रभाग क्रमांक सहा मधील विकासकामांचा उल्लेख करताना कदम म्हणाले की मागील पाच वर्षांत आठ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. नळपाणी योजनेच्या प्रचंड अडचणींवर प्रकाश टाकत त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मदतीने 48 कोटींचा निधी मंजूर झाला असून 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर खेड–दापोली रस्त्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की मुसळधार पावसामुळे कामात अडथळे आले. मात्र पुढील दोन-तीन महिन्यांत संपूर्ण रस्ता तयार होणार आहे. या रस्त्यासाठी 110 कोटी रुपये मंजूर झाले असून पुढील दहा वर्षांचा मेंटेनन्सही ठेकेदारावर असेल.
कदम म्हणाले की, खेड शहरात महायुतीला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून “कोणत्या प्रभागातून सर्वाधिक लीड मिळणार” याचीच चढाओढ लागली आहे. गृहराज्यमंत्री कदम यांनी ज्या प्रभागातून सर्वाधिक लीड मिळेल त्या प्रभागाला सर्वाधिक निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.
प्रभाग क्रमांक सहा येथील युतीच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी वैभव खेडेकर, संजय कदम, श्रेया कदम, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माधवी बुटाला, तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार सतीश उर्फ पप्पू चिकणे आणि वैभवी वैभव खेडेकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या शेवटी कदम यांनी प्रार्थना करत सांगितले की, “आमचे त्रिकूट असेच कायम राहू दे, आणि या एकीला कोणाची नजर लागू नये.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने खेड शहराच्या विकासासाठी पुरेशा निधीची कधीच कमतरता पडणार नाही, असेही त्यांनी आश्वासन दिले.