खेड (प्रतिनिधी) : रविवारी खेड शहरात आलेल्या भीषण पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची गंभीर दखल घेत खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खेड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन करवा यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत शहरातील पूरस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
व्हिडिओ कॉलदरम्यान खेड शहरातील मुख्य बाजारपेठ, व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान, पूरग्रस्त भागांतील सद्यस्थिती, मदतकार्याची प्रगती तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती गृहराज्यमंत्र्यांना देण्यात आली. पुरामुळे अनेक व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची बाबही यावेळी त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पूरग्रस्त नागरिक व व्यापाऱ्यांना तातडीने आवश्यक मदत मिळावी, नुकसानग्रस्तांचे पंचनामे जलदगतीने पूर्ण करावेत आणि मदतकार्य प्रभावीपणे राबवावे, यासाठी प्रशासनाशी समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या. कोणताही नागरिक मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी, शाखाप्रमुख आणि कार्यकर्ते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत असून नागरिकांनी कोणतीही अडचण किंवा मदतीची गरज भासल्यास स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांना आवश्यक ते सहकार्य मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे, असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी व्यक्त केला.













