वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात त्या लिपिकाचा दारू पिऊन धिंगाणा

डॉक्टर व कर्मचारी यांच्याशी हुज्जत

वैभववाडी | प्रतिनिधी
ड्युटीवर दारू पिऊन त-हाट असणा-या वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील त्या लिपिकाचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याने पुन्हा एकदा दारु पिऊन रुग्णालयात धिंगाणा घातला. डाॕक्टर व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत तमाशा केला. ही घटना सोमवारी सकाळी ११ वा. सुमारास घडली. वरिष्ठांना त्याचा प्रताप माहित असून देखील दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.
ग्रामीण रुग्णालयातील हा लिपिक नेहमी दारु पिऊन येतो. यापूर्वी त्याने असा अनेक वेळा धिंगाणा केला असल्याचे बोलले जात आहे. या अगोदर त्याची वैदयकिय अधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकाकडेही तक्रार केली आहे. माञ त्याच्यावर कोणताही फरक पडला नाही. त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्यामुळे डाॕक्टरांसह इतर कर्मचारी हैराण झाले आहेत. सोमवारी सकाळी पुन्हा हा लिपिक दारु पिऊन रुग्णांसमोरच आरडाओरडा करुन धिंगाणा केला. तसेच हजेरी पञकातही खाडाखोड केल्याचे समजते.
सदर  लिपिक काम वेळच्यावेळी करीत नसल्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पैसे येऊनही वेळेत पगार होत नाही. त्यामुळे डाॕक्टरांसह कर्मचारीही वैतागले आहेत. यापूर्वी त्याची पोलिसातही तक्रारही देण्यात आली आहे. माञ त्याचे हे नेहमीचेच झाले आहे. तक्रार करुनही कोणी दखल घेत नसल्याचे डाॕक्टरांनी सांगितले. प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी व कर्मचारी याच्या जाचाला अक्षरशा कंटाळले आहेत. ही पार्सल इथून हालवा अशी मागणी केली जात आहे.