दु:ख उराशी बाळगत सामाजिक चळवळीत आई वडिलांचा मोठा निर्णय
दापोली : शासन स्तरापासून ते स्वयंसेवी संस्थांपर्यंत ‘अवयवदान चळवळ’ प्रभावीपणे राबविली जात असल्याचा दावा केला जात असला तरी, प्रत्यक्षात चळवळीतून अवयवदान किती होते हा चिंताजनक प्रश्न आहे. देशात दरवर्षी पाच लाखांपेक्षा अधिक रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची गरज आहे. प्रत्यक्षात देशात केवळ ०.८० टक्केच अवयवदान होत असल्याने, कित्येकांना अवयवांअभावी आपला जीव गमवावा लागत असल्याची विदारक स्थिती आहे.
बदलेल्या जीवन पद्धतीचा विपरीत परिणाम आरोग्यावर होत असल्याने, अवयव निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे. नॅशनल हेल्थ पोर्टलनुसार, देशात दरवर्षी अवयव निकामी झाल्याने, पाच लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू होतो. त्यात दोन लाख रुग्णांचा मृत्यू यकृत निकामी झाल्याने होतो. पाश्चात्य देशांचा विचार केल्यास, अवयवांअभावी मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. भारतात रुढी, परंपरा, गैरसमजुतींमुळेअवयवदानांसाठी पुढे येणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे.
याचा अपवाद ठरला आहे दापोली तालुक्यातील कवडोली या ग्रामीण भागातील कुटुंबाचा. दापोली तालुक्यातील कवडोली गावातील सर्वसामान्य कुटुंबातील विकास वजीरकर आणि अश्विनी वजीरकर यांचा मुलगा आदित्य अवघ्या 21 वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या याचे डोळे पुन्हा एकदा सुंदर जगाची अनुभूती घेणार आहे. आदित्याचे कुटुंब हे सर्वसामान्य घराण्यातील आहे. मुळ दापोली तालुक्यातील कवडोली येथील असलेले हे कुटुंब रोजीरोटी साठी मुंबई येथील माटुंगा येथे राहत आहेत. आदित्य हा महाविद्यालयात शिक्षण घेत होता, डान्स कोरिओग्राफर मध्ये तो मास्टर होता. कॉलेजच्या टीम च्या माध्यमातून विलेपार्ले JVDP रोड येथे एका कार्यक्रमाला तो गेला असताना त्याला जनरेटर शॉर्ट सर्किटमुळे शॉक लागला. शाँक लागल्याचे समजताच येथील मित्रांनी त्याला तात्काळ कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. आदित्यला मृत घोषित केल्यानंतर एवढे मोठे दु:ख उराशी असताना आदित्यच्या आई -वडिलांनी अवयवदानाची इच्छा प्रकट केली. त्याच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे खितपत पडलेल्या रुग्णाला आता नवसंजीवन मिळणार आहे.
आई-वडिलांनी इच्छा प्रकट करताच कुपर ब्लड बँकेत काम करणारे भरत चौधरी यांनी पुढाकार घेऊन इतरांच्या सहकार्याने डॉक्टरांकडे संपर्क करताच डॉक्टरानी वेळ वाया न घालवता नेत्रदानाची प्रक्रिया लगेचच कुपर हॉस्पिटल, मुंबई येथे प्रक्रिया पार पाडण्यात आली. यामध्ये आदित्यचे डोळे दान करण्यात आले.












