कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम

सावंतवाडी । प्रतिनिधी : आगामी सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि मतदारांमध्ये निर्भय वातावरणाची खात्री देण्यासाठी सावंतवाडी पोलीस दलातर्फे काल बुधवारी सायंकाळी ‘रूट मार्च’ (संचलन) आयोजित करण्यात आला होता.
हा ‘रूट मार्च ‘शहराच्या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आला. जगन्नाथराव भोसले उद्यान येथून सुरू झालेला हा रूट मार्च आरपीडी स्कूल, मँगो हॉटेल, जयप्रकाश चौक, गांधी चौक, राऊतपुरम नाका मार्गे पुन्हा नगरपालिका रोडने जगन्नाथराव भोसले उद्यानात समाप्त झाला.
या संचलनामध्ये सावंतवाडी पोलीस ठाण्याचे चार अधिकारी आणि १५ अंमलदार, तसेच दंगल नियंत्रण पथकाचे ४२ अंमलदार आणि पाच होमगार्ड यांचा सक्रिय सहभाग होता. एकूण चार अधिकारी आणि ६२ जवानांनी या रूट मार्चमध्ये भाग घेतला.
पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली या रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. नगरपालिका निवडणूक शांततापूर्ण, निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पाडणे, तसेच शहरातील जनतेला सुरक्षिततेची आणि पोलिसांच्या सज्जतेची ग्वाही देणे हा या संचलनाचा मुख्य उद्देश होता. कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना थारा दिला जाणार नाही, असा संदेश या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आला.
या संचलनामुळे निवडणुकीच्या काळात आवश्यक ती खबरदारी घेतली जात असून, पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याची जाणीव नागरिकांना झाली.
सावंतवाडी शहर व परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध आहे आणि मतदारांनी कोणत्याही दबावाखाली न येता निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.










